नारायण कदम यांना डॉ.शंकराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार प्रदान

नांदेड  ; कृषीक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करत कृतिशील शेती करणारे शेतकरी नारायण कदम यांना श्रीक्षेत्र माळेगाव येथे जिल्हा परिषद नांदेड च्यावतीने दिला जाणारा डॉ. शंकराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार आ. शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमनशट्टे, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे.

नांदेड तालुक्यातील खडकी येथील प्रगतशील शेतकरी नारायण कदम यांनी आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण उत्पादन घेतले आहेत. संपूर्ण शेती सोलारवर आधारित केली असून विजेची बचत करत आणि भारनियमनापासून सुटका मिळवत आधुनिक पध्दतीने शेती केली आहे. बेडवर मलचिंग टाकून टरबूज पीक घेतले. ऊस, केळी, हळद आणि अद्रक अशी पिके घेऊन त्यांनी आर्थिक उत्पन्न साधले आहे. शिवाय इतर शेतकर्‍यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. शेतीस लागणारा पाणीपुरवठा सोलार पंपावर आणि ठिबकद्वारे असल्याने विजेची बचत होऊन शेतीला दिवसा पाणी मिळते आहे. त्यामुळे नारायण कदम यांच्या या आधुनिक शेतीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार त्यांना माळेगाव येथे प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी गटविकास अधिकारी राजेश मुक्कावार, कृषी अधिकारी छाया देशमुख, पी.एम. जाधव, विस्तार अधिकारी सतीश लकडे, धनराज शिंदे, श्रीमती पी.वाय. धांडे यांचे नारायण कदम यांनी आभार मानले आहेत. मिळालेल्या पुरस्कारामुळे कृषीक्षेत्रात अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली असून आगामी काळात ग्रामीण भागातील शेती अधिक संपन्न आणि समृद्ध करण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू, असा विश्वास नारायण कदम यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *