नांदेड ; प्रतिनिधी
नांदेडची ठप्प पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही अनेक विमान कंपन्यांशी संपर्क साधून नांदेडहून विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
चव्हाण यांनी १४ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे शिंदे यांची भेट घेऊन नांदेडची विमानसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या असुविधेविषयी अवगत केले होते. नांदेडवरून मुंबई, हैद्राबाद, नवी दिल्ली, अमृतसर, चंदिगड, पुणे, शिर्डी, नागपूरसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नागरी उड्डयण मंत्र्यांनी चव्हाण यांना पत्र लिहिले आहे.’उडाण’ योजनेंतर्गत पुढील टप्प्यातील प्रक्रियेत नांदेडहून मुंबई, हैद्राबाद व शिर्डी या मार्गांवर सेवा सुरू करण्यास कोणत्याही विमान कंपनीने अनुकूलता दर्शवल्यास त्यावर विचार केला जाईल.
‘उडाण’ योजनेंतर्गत केवळ ६०० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शहरांमध्ये विमानसेवा उपलब्ध करून दिली जाते. नवी दिल्ली, चंदिगड व अमृतसर ही शहरे त्याहून अधिक अंतरावर असल्याने या मार्गांवर व्यावसायिक व्यवहार्यतेनुसार विमान कंपन्या आपली सेवा सुरू करू शकतात, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर अशोक चव्हाण यांनी या मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याबाबत केलेली मागणी आपण नियमित विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना कळवत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.