फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ अंतर्गत असलेल्या सोमासवाडी येथील रहिवासी असलेले बालाजी किशनराव रासवते वय ४० वर्ष हे काल ता. २ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या मुलीला उदगीरहुन आणायला गेले असता परत येताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर असलेल्या पाटोदा खुर्द नजीक वळणाच्या ठिकाणी दुचाकी क्रमांक एम एच २६ , ए वाय ८२२६ चा अपघात होऊन बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक ची माहिती अशी की , बालाजी रासवते यांची द्वितीय कन्या राजश्री चा राजेश श्रीमंगले राहणार लहान ता. तामसा जि. नांदेड येथील युवकाशी गेले वर्षी विवाह लावून दिला होता. कामधंद्याच्या निमित्ताने राजेश श्रीमंगले हे आपल्या पत्नीला म्हणजे च राजश्री ला घेऊन उदगीर येथे राहत होते. राजश्री ही सात महिन्याची गरोदर असल्याने आपल्या मुलीला आणण्यासाठी बाप बालाजी रासवते हे ता. २ जानेवारी रोजी सायंकाळी उदगीर ला गेले आणि रात्रीच्याच वेळी मुलीला घेऊन परत येत असताना रात्री उशिरा पाटोदा खुर्द पाटीच्या शेजारी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वळणाच्या ठिकाणी सदर मोटारसायकल रस्त्याच्या बाजूच्या खोल खड्ड्यात कोसळल्याने दोघेही बाप-लेकी च्या डोक्याला व इतर ठिकाणी जबरदस्त मार लागल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने मदतीला वेळेवर कोणीही पोहचू शकले नसल्याने त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
ता.३ जानेवारी रोज मंगळवारी सकाळी पहाटे पाटोदा येथील युवक व्यायाम करण्यासाठी सदर रस्त्यावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या शेजारी खड्ड्यात एक दुचाकी तसेच एक पुरुष व एक महिला असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी जवळ जाऊन अंदाज घेतला असता दोघेही मृत असल्याचे कळताच त्यांनी जळकोट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली , त्यावरून तेथील पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा स्थळ पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.