मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर व्यंकटेश या बालकावर काळाचा घाला; कॅनलमध्ये पडून मृत्यू *——— कंधार तालुक्यातील बोरी (खु.) येथील घटना

कंधार : विश्वांभर बसवंते

 

 

तालुक्यातील बोरी (खु.) येथील रहिवासी इयत्ता ७ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी व्यंकटेश ज्ञानोबा पांचाळ हा काल दि.१४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास बोरी शिवारातील कॅनल वर पाणी पिण्यासाठी गेला असता पाय घसरून कॅनलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. ऐन मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या कोवळ्या बालकावर काळाने घाला घातला त्यामुळे बोरी गावावर शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दि.१४ जानेवारी २०२३ रोजी बोरी (खु.) शिवारातून वाहणाऱ्या कॅनलमध्ये ७ वी वर्गात शिकत असलेला विद्यार्थी व्यंकटेश ज्ञानोबा पांचाळ वय १३ वर्षे हा दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास कॅनलवर पाणी पिण्यासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. त्यास पोहता येत नसल्याने सदर विद्यार्थी पाण्यामध्ये बुडाला. ही बाब कंधारचे कर्तव्यदक्ष परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनुपसिंह यादव यांना समजताच तात्काळ कंधार तहसील कार्यालयामार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकास तात्काळ कॅनलकडे पाठवून सदर बालकाचा शोध घेण्याचे आदेशित केले.

या आदेशानुसार नायब तहसीलदार संतोष कामठेकर, मंडळ अधिकारी एस.एम.पटणे, तलाठी, समन्वयक मन्मथ थोटे, सेवक राखे हे पथक प्रत्यक्ष कॅनल वर फिरून प्रेताचा शोध घेत होते. दि.१५ जानेवारी २०२३ रोज रविवार सकाळी ११:४५ वाजता सदरील मुलाचे प्रेत बोरी शिवारातील कॅनल मध्ये सापडले. सदरचे प्रेत हे शवविच्छेदनासाठी खाजगी वाहनाने माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांनी दिली.

सदर बालकाचे प्रेत शोधण्यासाठी बोरी (खु.) सरपंच प्रतिनिधी रामकिशन अंबादास पंदलवाड, सूर्यकांत गोरपल्ले, ग्रा.प.सदस्य व बोरी ग्रामपंचायत ग्रामस्थांनी सहकार्य केले व सदर मृत विद्यार्थ्यास राजीव गांधी अपघात विमा योजना व स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना यात समावेश करून पांचाळ कुटुंबास आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती नायब तहसिलदार संतोष कामठेकर यांच्याकडे केली आहे. बोरी (खु.) हे गाव माळाकोळी पोलीस स्टेशन लोहा अंतर्गत असल्याने पुढील कार्यवाहीची प्रक्रिया माळाकोळी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राठोड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *