नांदेड :- दि.31 आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांचा महासत्संग उद्या दि. 1 फेब्रुवारी रोजी जुना कौठा भागातील मामा चौक परिसरात होणार असुन यानिमित्ताने जय्यत तयारी सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासन व संयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कार्यक्रम नियोजनासंदर्भात त्यांना कांही महत्वपूर्ण सूचना केल्या.
श्री श्री रविशंकरजी यांची 1 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे गुरुवाणी होणार आहे. यानिमित्ताने मागील कांही दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी या संदर्भात अनेक बैठका घेतल्या. कार्यक्रम यशस्वीतेचा त्यांनी आराखडा तयार केला. अंतिम तयारीची पाहणी केली. यावेळी माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे नंदकिशोराव आहुटी, दडू पुरोहित, पोलिस निरिक्षक अशोक घोरबांड यांची यावेळी उपस्थिती होती.