लोहा प्रतिनिधी/
लोहा शहरातील वेंकटेश गार्डनमंगल कार्यालयामध्ये सोमवार दि.30 जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वतीने कृषीवल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , या कार्यक्रमास लोहा शहर व तालुकतील हजारो महिला भगिनींनी उपस्थित होत्या, या कार्यक्रमास प्रमुख आकर्षण म्हणून आशीर्वाद तुझा एकविरा आई फेम सिनेअभिनेत्री मयुरी वाघ, जीवाची होतीया काहिली सोनी मराठी सिनेअभिनेत्री श्रुतकिर्ती सावंत व गाथा नवनाथाची मालिका फेम जयेश शेवाळकर हे प्रमुख सिने कलाकार उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सिने कलाकारांचा यथोचित सत्कार सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी व्यासपीठावरून आशाताई शिंदे उपस्थित हजारो महिला भगिनींना बोलताना म्हणाल्या की, मकरसंक्रांति निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सर्व महिला भगिनींसाठी आनंदाचा असतोच हा कार्यक्रम म्हणजे संबंध महिलांसाठी दिवस मानाचा सौभाग्याचा, सन्मानाचा व अस्मितेचा असतो महिलांना समाजामध्ये कायम दुय्यमपणा दिला जातो पण मी लोहा कंधार मतदार संघातील महिला भगिनींना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मी आगामी काळात पुढाकार घेणार असून मतदारसंघातील प्रत्येक गाव वाडी तांड्यावरील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट व शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध असून मतदारसंघातील महिला भगिनींनो तुम्ही स्वतःला कमी समजू नका मी तुमच्या सदैव पाठीशी आहे, महिला शिकल्या तरच टिकतील यासाठी मुली व महिलांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असेही सौ. आशाताई शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले,
यावेळी उपस्थित सिने अभिनेत्री यांनीही कार्यक्रमास उपस्थित हजारो महिलांशी मनमोकळेपणे संवाद साधला, या हळदी कुंकू कार्यक्रमास दुपारी चार वाजता पासूनच महिलांनी अलोट गर्दी केली होती, सायंकाळी 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम अत्यंत शांततेत व उत्साहात संपन्न झाला, यावेळी सिने अभिनेत्री व सौ आशाताई शिंदे यांच्या वतीने महिलांना हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले, जवळपास सहा तास चाललेल्या या हळदीकुंकू कार्यक्रमास शहर व परिसरातील महिलांनी हजारोंच्या संख्येने अलोट गर्दी करत अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचे आभार मानले.