कंधार ; शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक सांस्कृतिक, सामाजिक व बौध्दिक विकास व्हावा. या उद्देशाने शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम “ग्रंथालय शाळेच्या दारी” राबविण्याचे ठरविले आहे.
सदरील योजना राबविण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांच्या पत्रानुसार, आदरणीय श्री अनुपसिंह यादव, प्रशासक नगरपरिषद कंधार व श्री कारभारी दिवेकर मुख्य अधिकारी कंधार नगर परिषदेच्या यांच्या मान्यतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाने, श्री गणपतराव मोरे विद्यालय या शाळेसाठी सदरील उपक्रम राबवून येथील 50 विद्यार्थ्यांना मोफत वर्गणीदार सभासद केले.
तसेच बाकी सर्व विद्यार्थी हि सदरील योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले, यावेळी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री कौंसल्ये सर व स. ग्रंथपाल मोहम्मद रफीक सत्तार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यानंतर श्री मोहम्मद रफीक सत्तार यांनी ग्रंथालय विषयी माहिती देऊन सदरील योजनेचा पुरेपूर फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनापासून वाचनाची आवड निर्माण करावी. असे सांगितले. व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनासाठी योग्य व मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर श्री साळुंखे सरांनी ही वाचनालयाचे महत्त्व व त्याचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले, त्यानंतर श्री कौसल्ये सर मुख्याध्यापक, यांनी विद्यार्थ्यांना वाचनालयाचे महत्त्व शैक्षणिक जीवनामध्ये त्याचे फायदे मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रविण गव्हाणे सर, यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नगर परिषदेतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास गणपतराव मोरे विद्यालय येथील सर्व शिक्षक व स्टाफ तसेच ग्रंथालयाचे श्री मिलिंद महाराज उपस्थित होते.