उपक्रम – स्मृतिगंध (क्र.१)
कवी – गणेश हरी पाटील
(कविता – देवा तुझे किती)
प्राचार्य गणेश हरी पाटील हे कवी, बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
जन्म : १९ ऑगस्ट १९०६.मृत्यू : १ जुलै, १९८९. यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत अभ्यासक्रमात होत्या.
वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ’बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. ग. ह. पाटील यांच्या कवितांचा संग्रह ’गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता’ या पुस्तकाद्वारा प्रकाशित झाला आहे. पुस्तकाचे संपादन त्यांच्या कन्या डॉ. मंदा खांडगे यांनी केले आहे. पुस्तकाला शांता शेळके यांची प्रस्तावना आहे. ग.ह. पाटील यांचा ’लिंबोळ्या’ या नावाचा एक कवितासंग्रह आहे. त्यात त्यांच्या बालकवितांशिवायच्या अनेक कविता आहेत.
ग.ह.पाटील यांनी अनेक उत्तमोत्तम बालकविता लिहिल्या. त्यातलीच एक सर्वपरिचीत आणि मुखोद्गत असलेली कविता म्हणजे *”देवा तुझे किती”*.निसर्गात आकाश, सूर्य, चंद्र, चांदण्या, झाडे, वेली, पक्षी हे सारे आपण सर्वचजण नेहमीच पहात असतो. पण निसर्गातील या विविध घटकांचे सौंदर्य अचुकतेने साध्या सरळ आणि सोप्या शब्दात ग.ह.पाटील मुलांसाठी आपल्या बालकवितेत टिपतात.
हा निसर्ग जर एवढा सुंदर आहे, तर याची निर्मिती करणारा देव किती सुंदर असेल? असा भाबडा प्रश्न ग.ह.पाटील लहान मुल होऊन आपल्या कवितेतून देवालाच विचारतात.अभंग रचना प्रकारात असलेली ही कविता आपल्या मनात घर करून राहते ती या कवितेतील सरळ सोपे शब्द आणि तितकीच सुंदर तरल चाल यामुळे.
चला तर मित्रांनो, पुन्हा लहान होऊन शाळेत जाऊन वर्गात बसुया आणि या सुंदर आठवणीतल्या कवितेचा आनंद घेऊया –
*देवा तुझे किती*———————-
देवा तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश, सूर्य देतो !
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर , पडे त्याचे !
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे, गाणे गाती !
सुंदर वेलींची, सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले, देवा तुझी !
इतुके सुंदर, जग तुझे जर
किती तू सुंदर, असशील !
——- – ग. ह. पाटील
———————-
(विजो) विजय जोशी – डोंबिवली
कविता मनामनातल्या..
.(प्रत्येक गुरुवार आणि रविवार)
९८९२७५२२४२