आनंद कल्याणकर:तरोड्याचा तालेवार

आनंद कल्याणकर

एके काळी आकाशवाणीवर ‘नांदेडहून मी आनंद कल्याणकर’ असं वाक्य ऐकलं की खूप बरं वाटायचं.आजही अधूनमधून हे नाव कानावर पडतंच‌.आपल्या जवळचा माणूस प्रसारमाध्यमातून उमटून पडला तर त्याचा आनंद होणं स्वाभाविकच.

उणी पुरी तीस-पस्तीस वर्ष झाली असावीत.नव्वदच्या दशकात आनंद कल्याणकर नावाचा विद्यार्थी आमच्या यशवंत महाविद्यालयात दाखल झाला.उंची जेमतेम पण डेअरिंगबाज.सोबत पाच दहा मित्रांचं टोळकं.

बोलायला भलताच खमंग.आम्ही नुकतेच नोकरीला लागलेलो.त्याच कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांशी दुहेरी नातं.आनंद कल्याणकर नावाचा हा चुणचुणीत मुलगा महाविद्यालयाच्या पटांगणात पहिल्यांदा भेटला त्यावेळी बहुधा बा.ह.कल्याणकर, कृष्णराव भिसे,नारायण शिंदे,प्रताप पावडे, वामनराव गोरठेकर ही मित्र मंडळी सोबत होती.

त्यानंतर एके दिवशी ग्रंथालयाच्या इमारतीसमोर काही विद्यार्थ्यांच्या घोळक्यात हा खणखणीत आवाजाचा विद्यार्थी तावातावाने बोलतांना दिसला.विद्यार्थ्यांचे ग्रंथालयाच्या संदर्भात काही प्रश्न होते.त्या अनुषंगाने विद्यार्थी गोळा झाले होते आणि आनंदराव त्यांचं नेतृत्व करीत होते.

‘यशवंत’मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विशेष भरणा असायचा.त्यातही राजकीय पिंड असलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक.या मुलांची नेतृत्त्वासाठी चाललेली धडपड.तेव्हाच आम्ही ताडलं आनंदराव हे रसायन साधं नाही.इथं नेतृत्त्वाची खुमखुमी सामावलेली आहे.तसं आनंदरावचं गाव नांदेडला खेटून.तरोडा बुद्रुक. व्यंकटराव तरोडेकर हे नांदेडचे खासदार याच गावचे.

त्यामुळे राजकारणाचे डावपेच अंगणातच मुखपाठ.आनंदराव राहायचे शिवाजीनगरला.त्यांचे ज्येष्ठ बंधू एन.जी.देशमुख हे नगरपालिकेत मोठ्या हुद्द्यावर.शिवाय नगरपालिकेत त्यांचा दबदबाही विलक्षण.एनजींचे घर माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या घराला लागून.तिकडूनही राजकारणाच्या चर्चा कानावर पडत.आनंदराव हे विद्यार्थी असताना पत्रकारितेत उतरले.’मराठी स्वराज्य’ हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले.

त्याच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन शंकररावजींच्या हस्ते झाले.ही घटना १९८५ ची.इथून आनंदराव यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली.त्यांनी ‘मराठी स्वराज्य’चे अनेक विशेषांक काढले.या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील माणसांचे प्रश्न मांडले.तरुणांच्या प्रश्नांसंदर्भात जागरूकपणे लिहिले.भक्कम भूमिका घेतली.

भारतभूषण गायकवाड सारख्या मित्राच्या साहाय्याने साहित्य विषयक सदरे चालविली.अखंडपणे हे साप्ताहिक सुरू ठेवले.शासनाच्या जाहिरातींचा ओघ कमी झालेला असताना सुध्दा ‘मराठी स्वराज्य’ जीवापाड जपले.आजही परशुराम वेणीकर सारखा व्यवस्थापक निर्दोष स्वरुपात हे साप्ताहिक वाचकांपर्यंत पोचवतो, ही बाब मुळीच साधी नाही.

आनंद कल्याणकर हे आकाशवाणी चे वार्ताहर म्हणून दीर्घकाळ सेवेत आहेत. लातूर-किल्लारीला भूकंप झाला.या भूकंपाची बातमी अत्यंत वेगाने जगभर जाऊ शकली,याचे श्रेय कल्याणकरांकडेच जाते.सर्वसामान्य माणसाचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडायला हवेत अशी त्यांची धारणा आहे.या धारणेला आजपर्यंत चिकटून आहेत.

आनंद कल्याणकर हे तरोडा गावचे सरपंच झाले.गाव शहराला चिकटून असल्यामुळे लोकांना नागरी सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील याकडे विशेषत्वाने लक्ष दिले.गावात विभागीय पातळीवरचं साहित्य संमेलन आयोजित केलं.तरोड्याची तालेवारी साहित्यिकांसमोर ठेवली.जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली कारकीर्द प्रभावी ठेवली.

ग्रामीण भागातील होतकरू पत्रकारांना परिषदेत सामावून घेतले.पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला.पत्रकारिता ही निःपक्षपाती असावी.सामान्य माणसाचे हीत हा पत्रकारितेचा केंद्रबिंदू असावा.या गोष्टीकडे आनंदरावांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले.आजही कोणत्या विशिष्ट पक्षाची तळी न उचलता जे योग्य आहे त्याविषयी लिहिणे आणि बोलणे त्यांना गरजेचे वाटते.

या संदर्भात समाज माध्यमातून ते वेळोवेळी लिहिताना दिसतात.आनंद कल्याणकर हे आमचे विद्यार्थी असले तरी मित्र म्हणूनच आमचे त्यांच्याशी स्नेहबंध आहेत.त्यांच्या व्यक्तीगत कौटुंबिक सुखदु:खाचे आम्ही साक्षीदार आहोत.दिसायला कणखर आणि बोलायला काहीसा स्पष्टवक्ता असलेला हा मित्र आतून खूप हळवा आणि प्रेमळ आहे.

माणसांच्या गरड्यात राहणे या माणसाला आवडते.म्हणून त्याचा गोतावळाही खूप तगडा आहे.समजून घेणारी सहचारिणी, एक मुलगा आणि एक मुलगी असे आटोपशीर कुटुंब आहे.मुलांच्या लग्नाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले आनंदराव नुकतेच आजोबा झालेले आहेत.

त्यांचा प्रवास आता वयाच्या साठीकडे सुरू झालेला आहे.आमच्या या मित्राचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

jagdish kadam sir

जगदीश कदम,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *