आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं, कुणाशी तरी काहीतरी भावनिक ऋणानुबंध जुळलेले असतात. नाहीतर एकशे छत्तीस कोटी लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते.? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.
म्हणून जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी कारण आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही ‘आपली माणसे.!’ रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण मैत्रीच्या नात्यात तसं नसतं, मन जुळलं की मैत्री होते.
ईटस् म्युच्युअल रिलेशन.! जे बंध खूप स्ट्राँग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे ‘मैं हुं ना..!!’ एवढे तीन शब्द संजीवनीबुटी सारखे काम करतात.
अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो, नात्यांनी समृध्द होणं तितकंच कठीण.!
हमारे चेहरे से न लगाओ हमारी उम्र का अंदाजा यारो, हम पर बिती जादा है हमने गुजारी कम है.! आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं.
नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा व अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी.
झोपताना रागात झोपू नये. जीवन अशाश्वत व क्षणभंगुर आहे त्यामुळे नियतीने दुसरा दिवस आयुष्यात उजाडला तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही,
आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो, की, माघार घ्यायची कुणी.? याचं सोप्प उत्तर आहे, ‘ज्याला सुखी व्हायचे आहे, त्याने पहिली माघार घ्यायची.’ ही प्रगल्भता गाठण्यासाठी बुढे नही बडे बनिये. केवळ वाढत्या वयाने प्रगल्भता वाढत नसते.
माझे बंधुतुल्य स्नेही व वयाच्या पंधराव्या वर्षी माझ्या हाती लेखणी देऊन माझा लेख फ्रंट पेजवर फोटोसह प्रकाशित करून माझा उत्साह वाढविणारे प्रा. रामेश्वरजी बद्दर रेणापुरकर सर यांच्याशी मोबाईलवर काल अनेक विषयांवर प्रदिर्घ संवाद साधण्याचा योग आला.
बोलण्याच्या ओघात ‘मुंँह मे राम बगल मे छुरी’ अशा वृत्तीच्या काही व्हाईट कॉलर्ड व्यक्तींचा त्यांना अनेकवेळा अत्यंत वाईट व विचित्र अनुभव येऊनही मधुर संबंध टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेली कसरत त्यांनी मला सांगितली.
आयुष्यभर नको ते चोरटे धंदे, लाचार लबाड्या केलेले महाभाग रिटायरमेंट नंतर निम्म्या गोवऱ्या मसनात पोहोचल्यावर समाजसेवेचे ढोंग कसे रचतात, प्रसिध्दीसाठी वाट्टेल ते खोटेनाटे धंदे कसे करतात, समाजाविषयी तळमळ असल्याचे नाटक पण केवळ देखाव्यासाठी कसे करतात, (अशा धटिंगणांना बडे नही सिर्फ बुढे म्हटले जाते)
याविषयी काही मतीदार आठवणी त्यांनी काल सांगितल्या. इमानदारीने प्रामाणिक सेवा करणाऱ्यांकडेही समाज या नालायकांमुळे संशयाने बघू लागतो ही भिती सुध्दा त्यांनी व्यक्त केली. एवढे असुनही त्यांच्याविषयी मनात यत्किंचितही किल्मिष न ठेवण्याची कला अवगत करा असा वडील भावाच्या पोटतिडकीने त्यांनी दिलेला सल्ला अंमलात आणुन सर्वांप्रती ‘मै हूँ ना.!’ हा सेवातत्पर भाव मनी बाळगायला काय हरकत आहे..?
तुम्हे ये जिद थी की हम बुलाते, हमे ये उम्मीद वो पुकारे, है नाम होंटोंपे अब भी लेकिन आवाज मे पड गई दरारे… अहंकार व गैरसमज ह्या सर्व नात्यांना सुरुंग लावणाऱ्या स्फोटक वाती आहेत, आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा.
अहंकाराची व गैरसमजुतीची वात विझवण्यातली मजा ज्याला कळाली, तो आनंदी जीवनाची आणखी एक पायरी चढला, खऱ्या अर्थाने विपश्यनित परमानंदप्राप्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे गेला. तुटलेले सर्व संवाद सुरु करुन सुसंवाद राखुया. सबका मंगल हो..!!
इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील (नांदेड)▪️
मास्टर कोच – जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युट,
नवी दिल्ली ▪️ राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद