मुंबई, पुण्यासह राज्यातील ३५४ तालुक्यात पत्रकार रस्त्यावर ;ठिकठिकाणी निदर्शनं :शशिकांत वारिशे यांची हत्येचा निषेध..!

 

आंदोलन यशस्वी केल्याबद्दल एस.एम.देशमुख
यांनी मानले राज्यातील पत्रकारांचे आभार

 

 

मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्त्या आणि राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मुंबईतील प्रमुख पत्रकार संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार आज मुंबईसह राज्यभर पत्रकारांनी काळ्या फिती लावून तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली.. तहसिलदार, कलेक्टर यांना निवेदनं दिली.. पत्रकारांच्या आंदोलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून राज्यातील ३५४ तालुक्यात आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला आहे..

 

 

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांना गाडी खाली चिरडून ठार करण्यात आले…रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून दलाल पंढरीनाथ आंबेरकर यानं ही निर्घृण हत्या केली.. त्याची संतप्त प्रतिक्रिया राज्यभर उमटली.. राज्यातील बहुतेक प्रमुख पत्रकार संघटनांनी घटनेचा निषेध केला.. तसेच परिषदेनं पुढाकार घेत सर्व संघटनांना एकत्र येण्याची विनंती केली.. त्यानुसार सर्व संघटनांची मुंबईत बैठक झाली आणि एकमुखाने राज्यभर निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला गेला.. त्यानुसार राज्यातील ३५४ तालुक्यात आणि ३६ जिल्ह्यात पत्रकारांची आंदोलनं झाली.. तहसिल अथवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा होत पत्रकारांनी निदर्शनं केली.. यावेळी पत्रकारांनी काळ्या फिती लावल्या होत्या.. शशिकांत वारिशे यांनी यांच्या हत्येचा निषेध असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.. रामटेकपासून सावंतवाडी, साक्री, शहादापासून देगलूर, मुखेड पर्यत आणि आकोट पासून रोहा, म्हसळा, वडवणी पर्यंत राज्याच्या सर्वच भागात पत्रकार रस्त्यावर आले…

 

परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी बीड येथे आंदोलनाचे नेतृत्व केले,विश्वस्त किरण नाईक मुंबईत, अध्यक्ष शरद पाबळे यांनी पुण्यात, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी राेहा , अलिबागेत, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी अहमदनगरमध्ये आंदोलनात भाग घेतला..
बीडमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आल्यानंतर माध्यमांशी बोलताना एस.एम देशमुख यांनी सरकार पंढरीनाथ आंबेरकर याला पाठिशी घालत असल्याचा थेट आरोप केला.. ३०२ सारखा गुन्हा दाखल असताना देखील आंबेरकर प्रकृत्तीचं कारण देत रूग्णालयात आराम करतो आहे.. त्याची रवानगी तातडीने तुरूंगात करावी अशी मागणी एस.एम यांनी केली आहे.. आरोपीची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेऊन त्याला मोक्का लावावा, शशिकांतच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशा मागण्याही त्यांनी केल्या.. या मागण्या मंजूर झाल्या नाही तर राज्यात पत्रकार उग्र आंदोलन करतील असा इशारा एस.एम यांनी दिला..बीडच्या आंदोलनात परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, डिजिटल मिडियाचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सहभागी झाले होते..

 

मुंबईतील सर्व संघटनांनी एकत्र गांधी पुतळ्यासमोर मुक निदर्शनं केली.. या आंदोलनात २०० पेक्षा जास्त पत्रकार सहभागी झाले होते..
आमच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यातील पत्रकारांनी आंदोलन यशस्वी करून दाखवल्याबद्दल एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे यांनी सर्व पत्रकार, सहभागी पत्रकार संघटनांचे आभार मानले आहेत…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *