फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
ठेकेदार आणि अधिकारी किती दिवस करणार मनमानी , सांगता येणार नाही कधी होईल जीवितहानी..
साहेब आता पाहू नका अंत नाही तर होईल कोणाचातरी देहांत..
नांदेड ते उस्माननगर – फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे फुलवळ येथे अर्धवट काम करून संबंधित मे. कलथीया एजन्सी गायब झाली . सदर रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच उर्वरित अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे अशी कित्येकदिवस झाले मागणी केली जात आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्या शिल्लक राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे आजपर्यंत कित्येकवेळा मोजमाप घेतले परंतु आजपर्यंतही राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी ना ठेकेदार इकडे फिरकला ना कोणता संबंधित अधिकारी . याबद्दल गावकऱ्यांतुन व प्रवाशातून संताप व्यक्त केला जात असून मोजमाप टाकून अनेक झाले तरीपण राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण आहे. त्यामुळे असेच म्हणण्याची वेळ आली की ठेकेदार आणि अधिकारी किती दिवस करणार मनमानी , सांगता येणार नाही कधी होईल जीवितहानी ? यावरून साहेब आता पाहू नका अंत नाही तर एकेदिवशी होईल कोणाचातरी देहांत.. अशी चिंता ही व्यक्त केली जात आहे.
सदर रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण व विद्युत डेपो हटवून काम पूर्ण करण्यास सहकार्य करावे असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राम पंचायत ला पत्र व्यवहार करून केवळ पळवाट काढली होती . आणि संबंधित विभाग केवळ झोपेचं सोंग घेत त्या कलथीया एजन्सीची पाठराखण करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. परंतु ग्रामस्थांच्या व प्रवाशांच्या वेळोवेळी भावना जाणुन घेत आणि रस्त्यावर होत असलेले नियमित चे छोटे मोठे अपघात पाहून पेपर च्या बातम्यांच्या माध्यमातून सदर प्रश्न नेहमीच लावून धरला. यावरून गेले वर्षी २७ जानेवारी रोजी उर्वरित कामासाठी मोजमाप टाकले खरे परंतु नेमकं घोड कुठं पेंड खातंय हेच कळेनासे झाले असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार च यासाठी जबाबदार नाहीत ना ? असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. तर आपापले हात ओले करत आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा असे म्हणत सदर काम मुद्दाम होऊन लांबणीवर टाकत असावेत का ? अशीच चर्चा सध्या सगळीकडे ऐकायला मिळत आहे.
फुलवळ बस स्थानक शेजारी जांब व मुखेड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाय पॉईंट तयार झाला असून त्या ठिकाणचे वळण हे अत्यंत धोकादायक बनले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढत असून आज ता. २२ फेब्रुवारी रोजी असाच एक ट्रक आणि कार चा भीषण अपघात होता होता वाचला आणि त्यातील प्रवाश्यांचा जीव भांड्यात पडला . परंतु असेच जर दररोज अपघात होत राहिले तर कधी कोणाचा जीव जाईल हे सांगणे कठीण असले तरी वाढत्या वाहतुकीचा विचार करता सावधानता बाळगणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याने प्रशासन व संबंधित ठेकेदार ला जागे करण्यासाठी आणि सदर अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी आता रास्ता रोको किंवा आंदोलन करण्याशिवाय पर्याय असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून ऐकायला मिळत आहेत.
याप्रकरणी फुलवळ ग्राम पंचायत ने वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला .आणि यासंदर्भात वारंवार बातम्या प्रकाशित करून प्रशासन व ठेकेदार यांना जागे करण्यासाठी प्रसार माध्यमाचा मोठा वाटा असल्याच्या भावना जनमाणसातून ऐकायला ही मिळाल्या , परंतु पैश्याच्या , सत्येच्या व अधिकाराच्या जोरावर निगरगट्ट झालेल्या या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना मात्र कशाचीच पर्वा नसल्याचे दिसून येत आहे.
केंद्रशासनाच्या या रस्त्याचे काम चालू होऊन जवळपास तीन वर्षे होत असले तरी ज्याठिकाणी खरी अडचण आहे त्याठिकाणचे काम पूर्ण न करता सदर ठेकेदार टोल नाक्याचे काम पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. त्यामुळे येथीलच कांही सुज्ञ , जाणकार व गावहिताचा विचार करणाऱ्या तरुणांनी आता मात्र एकच पवित्र घेतला आहे तो म्हणजे त्यांनी टोल नाक्याचे काम पूर्ण केले तर काही अडचण नाही परंतु जोपर्यंत येथील बसस्टँड चा अर्धवट रस्त्याचे काम ते पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत त्यांना टोल नाकाही आम्ही चालू करू देणार नसून वेळ प्रसंगी उपोषण करू , आंदोलन करू अन्यथा रास्तारोको असा निर्धार केला आहे.