नांदेड – फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली असून दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यापासून ग्रामीण भागातील पाणीटंचाई, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा तुटवडा, आटत चाललेले पाण्याचे स्रोत, बदलते हवामान या सर्व बाबींचा विचार करून शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावर्षी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मराठवाड्यातील लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यातील शाळा सकाळच्या वेळेत शाळा भरविण्यात याव्यात या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांनी निर्देश दिले आहेत. या संदर्भान्वये मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असते. या उन्हाच्या तीव्रतेमुळे मुलांना त्रास होतो. दुबार भरत असलेल्या शाळांच्या वेळा बदलून सकाळच्या सत्रात भरविल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया चांगली होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाने मार्च महिन्यापासून शाळा सकाळ सत्रात भरविण्यात याव्यात असे एका आदेशाद्वारे सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, सचिव रवी बंडेवार, कोषाध्यक्ष गंगाधर कदम, जिल्हा संघटक संजय मोरे आदींच्या सह्या आहे
________________
शाळांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच – डॉ. संगिता बिरगे
सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याबाबत प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. संगिता बिरगे म्हणाल्या की, या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यानंतर निर्णय होईल. सध्या तरी शाळांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच आहेत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील शिक्षकांसह पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी कोणत्याही शाळांच्या मुख्याध्यापकांनी पुढील निर्णय येईपर्यंत वेळापत्रकात कोणताही बदल करु नये असे संदेश पाठविले आहेत.