नांदेड- दि.१४ मोरक्को येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड पॅराअथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिग्झ 2023 सातव्या आंतराष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग क्रिडा स्पर्धेत नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री जाधव हिने तिसरा क्रमांक पटकाऊन कास्य पदकावर भारताचे नाव कोरले आहे.
नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई केली आहे.
दुबई येथे झालेल्या फाजा व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती.
या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
बेंगलोर येथे गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
नोव्हेंबर 2022 मध्ये पोर्तुगाल येथे जागतिकस्तरावर झालेल्या आयवॉज २०२२ या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य व कास्य पदक मिळवून भारताबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक केला.
७ मार्च ते १२ मार्च या कालावधीत उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स २०२३ ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पॅरालिंम्पिक कमिटी, नवी दिल्ली यांनी देशभरातील केवळ बारा खेळाडू यांची निवड केली होती. त्यामध्ये भाग्यश्री जाधव यांचा समावेश आहे. या स्पर्धेत ती पुन्हा भारताचे प्रतिनिधीत्व करणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे.
अवघ्या सहा वर्षाच्या क्रीडा प्रवासात भाग्यश्री जाधव यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.