महाराष्ट्रीयन संतांनी तेराव्या शतकात आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली- प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांचे प्रतिपादन

 

 

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत संतांची मोठी परंपरा होऊन गेली. मुळात संत कोणाला म्हणावे याची पहिल्यांदा व्याख्या संत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंगाच्या माध्यमातून केली. पुढे अनेक संतांनी संतांच्या व्याख्या केल्या. महाराष्ट्रीयन संतांची परंपरा संत तुकाराम यांच्या परम शिष्या बहिणाबाई यांनी संत कृपा झालीl इमारत फळा आली l ज्ञानदेवे रचिला पाया l तुका झालासे कळस l या रचनेच्या माध्यमातून संत परंपरा विस्ताराने उल्लेखित केली आहे. संतांनी खऱ्या अर्थाने तत्कालीन समाज व्यवस्थेत जातीयतेचा विरोध, स्त्री स्वातंत्र्य, अंधश्रद्धेचा विरोध, कर्माला महत्व, भूतदयेला महत्त्व,या व यासारख्या अनेक मानवतावादी गोष्टी समाजात निर्माण करून समतेवर आधारित समाज निर्माण केला.

कीर्तन, भारुड व अन्य साधनांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली असे प्रतिपादन ग्रामीण ( कला वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जी.नांदेड येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांनी ‘महाराष्ट्रातील संत परंपरा व सामाजिक स्थित्यंतरे ‘ या विषयावर मौजे गऊळ ता. कंधार येथे श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज बीज, अखंड हरिनाम सप्ताह व भव्य यात्रेनिमित्त डॉ.बी.एन.पितळे यांनी आपले वडील नारायणराव पितळे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यान परिसंवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.निवृत्ती कौसल्ये यांनी खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागात असल्याचे सांगितले.डॉ. भगवान पितळे सारखे समाजासाठी कार्य करणारे युवक निर्माण होण्याची गरज आहे. संतांनी मानवी मन घडविण्याचे काम केले. युवकांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. या भागाचा कायापालट घडवुन आणण्यात कै.भाई केशवराव धोंडगे साहेबांचे मोलाचे योगदान लाभले आहे. आपापल्या परीने सामाजिक काम करणे, माणसात प्रेम निर्माण होणे हेच खरे धार्मिक कार्य आहे.

ह.भ.प. दत्ता महाराज म्हणाले की संतांनी सर्वस्वाचा त्याग करून जगाचा संसार सुखमय बनवला.त्यांना हे काम करताना अनेक कष्ट पडले पण ते त्याला घाबरले नाहीत.संत तुकाराम महाराजांचा गाथा वाचल्याशिवाय माथा ठिकाण्या वर येत नाही. संत हे कर्माला महत्त्व देणारे होते.त्यांनी मराठी भाषेचा गौरव ही केला.संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य केले पाहिजे.

ह.भ.प.तुळशीराम महाराज गिरे म्हणाले की संतांनी हिंसेचा, व्यसनाचा, अंधश्रद्धेचा, जातीयतेचा कडाडून विरोध केला. आपण मात्र आज शिवजयंती असो की दुर्गा महोत्सव असो त्यांच्या विचारांचा जागर घालण्याऐवजी वेगळाच जागर घालतो आहोत हे योग्य नाही. कसे बोलावे, इथपासून जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तू पाठ संतांनी घालून दिला.

कार्यक्रमात डॉ.भगवान पितळे यांनी कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली व जन्मभूमीसाठी काहीतरी चांगले करावे या सद्येतूने मी हे काम करीत आहे त्याला आपला आशीर्वाद लाभावा. माझ्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय जाधव यांनी केले.
अध्यक्षस्थानी विठ्ठल रावजी तेलंग पाटील होते. कार्यक्रमाचे प्रारंभी नारायणराव पितळे गुरुजींचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सरपंच संभाजी महाराज, गंगाधर वडजे, हौसाजी जायभाये,अजय जाधव, शंकर तेलंग, लक्ष्मण रंगवाड, आई सौ. गिरीजाबाई नारायणराव पितळे,सौ.सपना भगवानराव पितळे, ग्रामस्थ माता भगिनी व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भाई कै.केशवराव धोंडगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *