फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ सह आंबूलगा , सोमासवाडी , मुंडेवाडी , कंधारेवाडी , पानशेवडी , गऊळ , जंगमवाडी , वाखरड सह परिसरात ता. १७ मार्च रोज शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. या अचानक सुरुवात झालेल्या अवकाळी पावसात गारांचाही समावेश होता. या धुव्वाधार पावसामुळे गहू , हळद , उन्हाळी ज्वारी , भुईमूग सह अन्य पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.
सध्या सर्वत्र हळद काढणे , गहू कापणे , राशी करणे ही शेतकऱ्यांची कामे चालू असून कापलेल्या गव्हाचे काड शेताने उघड्यावरच असल्याने या अचानक आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तब्बल एक तास अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेती पिकांचे तर नुकसान झाल असून उभे असलेले ज्वारी , गहू चक्क आडवे होऊन जमीनदोस्त झाली आहेत. तसेच शेतीकामासाठी शेतात असलेल्या शेतकरी व कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच शेतात असलेल्या मुक्या जनावरांचे ही मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून तोंडचा घास या अवकाळी पावसाने हिरावला तेंव्हा वर्षभर राबराब राबून , मेहनत , काबाडकष्ट करून ज्याच्यावर आशेची शिदोरी असते तेच निसर्गाने आमच्याकडून हिरावून घेतले . तेंव्हा संसाराचा गाडा हकावा तरी कसा अशाही भावना शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत असून या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून हवालदिल झालेल्या बळीराजाला मदतीचा हात द्यावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.