फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
नांदेड – बिदर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० या प्रमुख रस्त्यावरील फुलवळ ते बहाद्दरपुरा दरम्यान व मन्याड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याची १ एप्रिल पर्यंत तात्काळ डागडुजी व दुरुस्ती करावी अन्यथा ३ एप्रिल रोज शांतिघाट नेहरू बालोद्यान बहाद्दरपुरा येथे रास्तारोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार , ग्रामस्थ व सदर रस्त्यावरील प्रवासी यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय कार्यालय कंधार येथे देण्यात आले आहे.
ता. २९ मार्च रोज बुधवारी देण्यात आलेल्या निवेदनात असाही उल्लेख करण्यात आला आहे की , यापूर्वी ही अनेक संघटना , सामाजिक कार्यकर्ते यांनी यासंदर्भात तोंडी व लेखी तक्रार करूनही अद्याप तरी या रस्त्याची डागडुजी , दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे सामान्य जनतेला , प्रवाशांना , वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून यामुळे आजपर्यंत छोटे मोठे अनेक अपघात ही झाले आहेत. तरीपण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मन्याड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने जणमाणसाचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. यासर्व बाबींचा विचार करून झोपेचं सोंग घेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी फुलवळ येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ बनसोडे यांनी पुढाकार घेऊन सर्वांशी चर्चा करून संबंधित विभागाला लेखी निवेदन देण्या संदर्भात विचार मांडला , त्याला सर्वांनी होकार देत आज ता. २९ मार्च रोजी लेखी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देऊन त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय कार्यालय , तहसील कार्यालय , पोलीस ठाणे कंधार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने जर १ एप्रिल पर्यंत या रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती केली नाही तर ता. ३ एप्रिल रोज सोमवारी सकाळी १० वाजता नेहरू बालोद्यान शांतिघाट येथे रास्तारोको करून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्यानंतरच्या सामाजिक उद्रेकास मात्र प्रशासन सर्वतोपरी जबाबदार असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर नवनाथ बनसोडे सह फुलवळ येथील सर्व पत्रकार , गावातील सुज्ञ व जाणकार नागरिक तसेच या रस्त्यावरून प्रवास करणारे बहाद्दरपुरा , कंधारेवाडी , मुंडेवाडी , आंबूलगा सह परिसरातील जवळपास शंभर ते सव्वाशे नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदर निवेदन संबंधित सर्व कार्यालयात नवनाथ बनसोडे , परमेश्वर जाधव , आनंदा पवार , कैलास फुलवळे , ज्ञानोबा मुंडे , शंकर डिगोळे , राजेश्वर गायकवाड , सचिन पेठकर , नामदेव फुलवळे , ऍड. उमर शेख , बळीराम पवार , कोकाटे , पंडित देवकांबळे , यांच्या पुढाकाराने देण्यात आले.