नांदेड – जुनी पेंशन मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिनांक १४ फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारला होता. या संप कालावधीतील कर्मचारी बांधवांचे वेतन कपात करू नये अशी मागणी आंबेडकरी शिक्षक संघम चे राज्याध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.
कर्मचारी बांधवांचा बेमुदत संप निर्णायक टप्प्यावर असताना विविध कर्मचारी संघटनांमधील बेबनाव आणि परस्परातील संवादाचा अभाव यामुळे कुणालाही विश्वासात न घेता सुकाणू समितीच्या अती उत्साही नेत्यांनी संप मागे घेतला. त्यामुळे कर्मचारी बांधवांचा भ्रमनिरास झाला. संप मागे घेतांना कुठल्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार नाही आणि संप काळातील दिवसांचे अर्जित रजेत रूपांतर करण्यात येणार असल्याचे ठरले होते. परंतु प्रशासनाने पगार कपात करण्याचे आदेश काढले आहेत. हा कर्मचाऱ्यांशी केलेला विश्वासघात आहे. शासनाने त्वरित स्वतंत्र आदेश काढून प्रशासनाला आवश्यक त्या सुचना देऊन कर्मचाऱ्यांची वेतन कपात थांबवावी अशी मागणी प्रशांत वंजारे यांनी केले आहे.