सामाजिक वनीकरण चा वृक्षलागवडीत लाखोंचा घोटाळा ; सामान्य जनतेसह वरिष्ठ अधिकारी करताहेत कानाडोळा..

 

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

झाडे लावा झाडे जगवा या योजनेखाली शासन लाखोंचा निधी उपलब्ध करून देत पर्यावरणाचा ऱ्हास समतोल राखण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करत असतांना च सामाजिक वनीकरण च्या काही मस्तवाल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी व हेकेखोर कारभारामुळे याच वृक्षलागवड मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार , घोटाळा होत असल्याचे दिसून येत असतानाही सामान्य जनतेसह संबंधित वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे निष्पन्न होत असल्याने निसर्ग प्रेमी साहेबराव गायकवाड व प्रभाकर व्यवहारे यांनी याबाबतीत खंत व्यक्त केली असून यासंदर्भात प्रशासनाला लवकरच जाब विचारणार असून सदर गंभीर बाबीची चौकशी करण्यासाठी तक्रार करणार असल्याचे सांगितले.

कंधार तालुक्यात असलेले पण मुखेड विधानसभा मतदार संघात असलेले मंगनाळी ते सावरगाव या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षलागवड मंजूर असून या चार किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूंनी मिळून जवळपास आठ हजार वृक्षारोपण करायचे आहे. अंदाजे यासाठी ६५ लाख रुपये मंजूर असल्याचे ही समजते. या वृक्षारोपण साठी बारुळ येथील नर्सरीमधून लिंबाच्या झाडाचे रोपटे खरेदी केले असून आणलेल्या रोपट्यापैकी मंगनाळी – सावरगाव या ४ किलोमीटर च्या रस्त्यावर ता. १० मार्च २०२३ रोजी तुरळीक ठिकाणी तेही एकाच बाजूने बोटावर मोजण्याइतके वृक्षारोपण केले आहेत. तेही खड्डे न खोदता बाजूने दगड गोटे लावून फक्त रोपटे उभे केले आहेत तर बाकी रोपटे हे चुडाजीची वाडी येथील एका शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये फेकून दिले असल्याचेही साहेबराव गायकवाड व प्रभाकर व्यवहारे यांनी सांगितले आहे.

या विभागातील वनरक्षक व वनपाल यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून सविस्तर माहिती घ्यावी यासाठी संपर्क साधला असता ते चक्क फोन सुद्धा उचलायला तयार नसल्याची या दोघांनी खंत व्यक्त केली आणि शासनाने वृक्षारोपण या कामासाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून देऊनही असे भ्रष्ट कर्मचारी मनमानी कारभार करत लाखोंचा घोटाळा करत शासनांच्या योजनांना पायदळी तुडवत असल्याने शासनाचा उद्देश साध्य होत नसून आपल्याला दुष्काळी परिस्थिती ला तोंड द्यावे लागत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त करत आशा गोष्टी कडे सामान्य जनता व वरिष्ठ अधिकारी मात्र कानाडोळा करत असल्याने च असे प्रकार घडत आहेत असेही मत व्यक्त केले. परंतु आम्ही आता गप्प बसणार नसून लवकरच या सर्व बाबींचा छडा लावण्यासाठी संबंधित अधिकारी यांना भेटून त्या कार्यालयात तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

सदर घटनेवरून संबंधित सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी दत्तात्रय गित्ते यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती विचारली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत सध्या वृक्षलागवड चे कामच चालू नसल्याची चुकीची माहिती सांगत अशा उन्हात आम्ही कसे झाडे लावणार असा उल्लेख केला , परंतु जेंव्हा सदर वृक्षारोपण चे फोटो , व्हिडीओ दाखवले आणि रोपटे कुठून खरेदी केले , किती खरेदी , कुठं कुठं झाडे लावली , उर्वरित रोपटे कोणाच्या प्लॉट आज स्तिथीला पडून आहेत हे सर्व माहिती सांगितल्या नंतर कुठं ते कबूल झाले आणि निरुत्तर होऊन तत पप करत त्यांनी काढता पाय घेतला.

या सर्व प्रकारावरून असेच दिसून येते की , नक्कीच या वृक्षारोपण मध्ये भ्रष्टाचार झाला असावा आणि यासाठी वरिष्ठ सुद्धा यात मूग गिळून गप्प का आहेत . कदाचित त्यांचाच तर यांना वरदहस्त नाही ना ? अशी शंका उपस्थित होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *