१९९६ साली मी बारावी उत्तीर्ण झालो आणि कंधारच्या शिवाजी महाविद्यालयात बी.ए.च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. ऐच्छिक विषय म्हणून मराठी, इतिहास आणि शारीरिक शिक्षण असे विषय असलेला बी ग्रुप घेतला. खरं तर मला हिंदी विषय घ्यायचा होता. हिंदी हा ए ग्रुपला होता. त्यावेळी हिंदी हा माझ्या आवडीचा विषय. त्याकाळात डी.एड्.ची रेलचेल होती. म्हणून डी.एड्.करावं म्हणून प्रयत्न केले. पण नंबर लागला नाही. मग पुढं काय करायचं? असा प्रश्न निर्माण झाला. पुढं प्रवेश घ्यायचं ठरवलं. आई-वडील अडाणी ते तर काहीच करु शकत नव्हते. हिंदीला प्रवेश मिळाला नाही म्हणून मग मराठी विषय असलेला बी ग्रुप घेतला. पदवी स्तरावर माध्यमिकला असलेले किमान दोन विषय घ्या असं बारावीला शिकवायला असलेले मुळचे जळकोटचे. पण आमच्या गावात स्थायिक झालेले प्रा.डी.एम.किडे सर आम्हाला सांगायचे. तशातच बापानं गणपत देसाई यांचं बांधकाम बांधायला घेतलेलं. महाविध्यालय सुरु झालं अन् मी कामात गुंतलेलो. महाविध्यालय सुरु झाल्याचं लक्ष्मण पांचाळ या माझ्या मित्रानं सांगीतलं आणि आॅगस्ट महिन्यात मी महाविद्यालयात पहिलं पाऊल ठेवलं. शारीरिक शिक्षणाचे मैदानावर तास चालू होते. मी आणि माझे मित्र सुरेश टोम्पे, गंगाधर टोकलवाड तासिका करु लागलो. मैदानावरील तास करणे मला अवघड होवू लागले. प्रा.कळणे, प्रा.धुमाळ आणि प्रा.तोगरे सर हे या विषयाचे प्राध्यापक होते. या शिक्षकात प्रा.तोगरे सर मला अधिक जवळचे वाटू लागले. कारण ते माझ्या गावाकडचे होते. शिवाय त्यांचं आणि माझं आजोळ एकच ते म्हणजे कुरुळा. त्यामुळेच तोगरे सर आणि माझे ऋणानुबंध जुळले ते कायमचेच.
तोगरे सर हे अत्यंत कडक स्वभावाचे होते. रंग सावळा कॄष्णासारखा, हाफ शर्ट, इन आणि दाढी असलेलं एक रुबाबदार व्यक्तिमत्व असं तोगरे सरांचं व्यक्तिमत्त्व होतं. सरांचं अनुकरण म्हणून मीही काही काळ दाढी वाढवूनच राहत होतो. बाहेरुन कडक असले तरी फणसासारखे सर आतून मऊ आणि गोड होते. विद्यार्थांना सरांचा दरारा होता. सर आपल्या विषयात तरबेज होते.
माझ्या हाताला धरुन अनेक खेळ सरांनी मला शिकवले. थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक इ…असं हे सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुवर्य डॉ.जी.एम.तोगरे सर. आज एवढ्या वर्षानंतरही सर प्रफुल्लित असतात. शारीरिक शिक्षण हा विषय असल्यामुळे की काय ते नेहमी ताजेतवाने वाटतात. दाढी ठेवणं हा सरांचा आवडता छंद आहे. तो त्यांनी आयुष्यभर जपलाय. सर आज एकसष्ठ वर्षांचे झालेत. पण आजही ते शरीराने आणि मनाने अत्यंत तरुण आहेत. एखाद्या तरुणाला लाज वाटावी असं हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या शरीराकडे आजही आपण पाहिलं तर ते आत्ताही पन्नाशीच्या आतीलच वाटतात. कुणाची खोटी स्तुती करावी हा त्यांचा स्वभाव नाही. कुणाला राग आला तरी हरकत नाही. पण परखडपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे.
पूर्वीच्या उदगीर तालुक्यातील जळकोट या गावात भारतीय समाजव्यवस्थेने अस्पॄश्य ठरवलेल्या एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणाचा कसलाही गंध नाही की वारसा नाही असं हे कुटुंब. आई-वडील अडाणी असले तरी त्यांनी बाबासाहेबांचा संदेश ऐकला आणि आपल्या मुलांना शिकवण्याचा निश्चय केला. परिस्थितीशी दोन हात करत सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
जग बदल घालूनी घाव
सांगून गेले मज भीमराव
हा अण्णाभाऊंचा संदेश त्यांच्या मनावर परिणाम करुन गेला. जळकोट हे त्या काळात नामांतर चळवळीचं एक केंद्र होतं. या चळवळीच्या अनुषंगाने ते दलित पँथर या सामाजिक चळवळीकडे आकर्षित झाले. तेंव्हा काही काळ ते या संघटनेत कार्यरतही होते.
माणूस मोठा झाला की तो जुनं सारं सारं विसरतो. पण तोगरे सर हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे की त्यांनी जुनं विसरु दिलं नाही. आपले आई-वडील, आपले नातेवाईक, आपली माणसं, आपला गाव यांचा त्यांनी कधीच विसरू पडू दिला नाही. एका दलित समाजात जन्मलेला हा माणूस प्रोफेसर पदापर्यंत मजल मारली. ही गोष्टच माझ्यासारख्या सामान्य शिष्याला आश्चर्यचकीत करणारी आहे. बी.ए, बी.पीएड्, एम.पीएड् असं शिक्षण घेतलेल्या आपल्या मुलाने बाबासाहेबांची एकतरी पदवी मिळवावी ही वडिलांची इच्छा सरांनी पीएच.डी.मिळवून आणि प्रोफेसर होवून पूर्ण केली. दलित समाजात स्वतःच्या हक्काची जमीन नसते. आपल्यालाही जमिनीचा एखादा तुकडा असावा असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. पण ते वडिलांच्या हयातीत शक्य झाले नाही. जमीनच काय स्मशानभूमीही नसलेल्या जातीत अंत्यसंस्कारही रस्त्यावरच करावे लागतात. ही गोष्ट सरांना खटकली आणि वडिलांच्या मॄत्यूनंतर स्वतःच्या हक्काची जमीन खरेदी करुन वडिलांची समाधी त्या शेतात बांधून मॄत्यूनंतर का होईना हक्काची जमीन खरेदी करण्याचे बापाचे स्वप्न सरांनी पूर्ण केले.
एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेला हा माणूस समाजाशी नाळ अद्यापही जोडूनच आहे. आपल्या समाजाचा त्यांनी कधीच विसर पडू दिला नाही. कंधारच्या म.फुले सोसायटीमध्ये त्यांनी केलेला निवास आजही मला आठवतो. समाजात जगत असताना प्रत्येक माणसाला काही प्रश्न पडतात. तसेच प्रश्न सरांनाही पडले. काही प्रश्न माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यांच्या मनात सलत असलेल्या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले. समाजाच्या व्यथा आपण मांडल्या पाहिजेत असे त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले. बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा जो मंत्र दलित समाजाला दिलेला होता. तो मंत्रच प्रत्यक्ष घेऊन तोगरे सर जगत होते. सर शिकले आणि समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते संघर्ष करावयास तयार झाले. आणि मग त्यांची लेखणी गेल्या वीस-बावीस वर्षांपासून अविरतपणे वृत्तपत्रातून समाजातील विविध समस्या, अडीअडचणी, कंधारचा इतिहास, कंधारची संस्कृती, कंधारचा किल्ला, इतिहास, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शेती, दुष्काळ यावर त्यांच्या लेखणीने सतत प्रकाश टाकला. या क्षेत्रातही सरांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आणि लेखणीचा ठसा उमटला. त्यासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मीही तेंव्हा नव्याने कविता लिहू लागलो होतो. सरांनी माझी अभिरुची ओळखली होती. कंधारच्या शिवाजी महाविद्यालयात त्या काळात जी.एम.तोगरे आणि डी.डी.घोडके असे दोन प्राध्यापक होते. मी आणि माझा मित्र गंगाधर टोकलवाड नियमितपणे तासिका करायचो. आमचे गुरुवर्य डॉ.खामकर हजेरी घेताना आम्हाला हसायचे. जीएमटी आणि डीडीजी असं ते आम्हाला म्हणायचे. तोगरे आणि घोडके सरांच्या नावाची आद्यक्षर आमच्या नावाशी साम्य दर्शवणारी होती. तोगरे सरांनी एकदा त्यांच्या घरी पाठवलं होतं. सर त्यावेळी फुले हाउसिंग सोसायटीत कटारे सरांच्या घरासमोरच राहायचे. मॅडमनी सरांचे विद्यार्थी म्हणून आमचा सन्मान केला. सरांच्या मुलाला कोणतंतरी पारितोषिक मिळालेलं होतं ती बातमी पेपरला द्यायची होती. म्हणून मुलाचा फोटो पाहिजे होता. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. म्हणून थेट घरचं गाठावं लागलं. टोकलवाड आणि मी त्यावेळी दोन-तीन वॄत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्यरत होतो. आम्ही त्यावेळी बातम्या दिल्या आणि त्या बातम्या दै.अजिंठा, दै.गावकरी, दै.मराठवाडा या वॄत्तपत्रात छापून आल्या होत्या. सर आमच्यावर जाम खुश झालेले. मला आठवतं धुमाळ सरांना त्यावेळी आदर्श जेसीएस पुरस्कार मिळाला होता. त्याच्याही बातम्या आम्ही दिल्या. त्या छापून आल्या. मग आम्ही बातम्या लागल्या म्हणून कितीतरी दिवस आकाशात भिरभिरत होतो. असे ते कंधारच्या काॅलेजचे अविस्मरणीय दिवस होते.
सरांच्या मार्गदर्शनामुळे आज विविध क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. गंगाप्रसाद यन्नावार, कवी ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक महालिंगे, आशालता गुट्टे यासारखे त्यांचे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नावारुपाला आले आहेत. काही खेळाडूही सरांच्या मार्गदर्शनामुळे निर्माण झाले. मयुरी लुंगारे, अर्जुन गुट्टे, एल.एन.मुंडे, कु.एम.डी.निलावाड, अशी काही विद्यार्थ्यांची नावही सांगता येतील. प्राध्यापक, विभाग प्रमुख, प्रोफेसर असा प्रवास करुन माझे गुरुवर्य प्रोफेसर डॉ.जी.एम.तोगरे सर गतवर्षी सेवानिवृत्त झाले. आज त्यांना ६१ वर्षे पूर्ण झाले. वाढदिवसा निमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो आणि पुढील आयुष्यासाठी कवितेतून सरांना शुभेच्छा देतो.
तोगरे गुरुजींच्या चरणाला…
माझ्या गुरुचे हात शिरावर
मग कसली चिंता माझ्या मना
निराशकाळी बळ हत्तीचे
तुम्ही ‘फक्त लढ’ म्हणा
आयुष्य हे दुःखाने भरलेले
तरी तुम्ही कणखर होवून जगणारे
एकसष्ठीतही उत्साही तुम्ही
तरुणांनाही लाजवणारे
देशोदेशी वार्ता पसरली
तोगरे घराण्याची
पराक्रम असा केला
खुशी मज मांडण्याची
माझी कविता साद घालते
तोगरे गुरुजींच्या चरणाला
डोळे का ओले झाले
बांध घालूया अश्रूरुपी धरणाला…
– प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड
(मु.पो.कुरुळा ता.कंधार जि.नांदेड)
भ्रमणध्वनी : ९६६५७०३०४३