कंधार ( विश्वांभर बसवंते )
राज्य सरकारच्या वतीने गोरगरिबांना दिवाळी सण गोड व्हावा यासाठी सर्वसामान्य स्वस्त धान्य लाभधारकांना केवळ शंभर रुपयात एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो रवा आणि एक लिटर पाम तेल या चार शिधा जिनसचा संच देण्यात आला होता. त्यामुळे गोरगरिबांची दिवाळी गोड झाली. दिवाळी सणाप्रमाणेच गुढीपाडवा हा सण पण गोरगरिबांना गोड व्हावा या संकल्पनेतून गेल्या फेब्रुवारी महिन्यात गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते, परंतु हिंदू धर्मियांचे नवीन वर्ष गुढीपाडवा या सणापासून प्रारंभीत होते आणि हा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा मिळेल अशी अपेक्षा स्वस्त धान्य लाभधारकांना होती पण हा शिधा गुढीपाडव्याला मिळाला नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर निघाला होता. आनंदाच्या शिधेचा शासन स्तरावरून संथ गतीने प्रवास सुरू असल्याने आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर तरी ‘आनंदाचा शिधा’ मिळावा यासाठी ४३ हजार ९७७ लाभधारक प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.
गुढीपाडवा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याची घोषणा माहे फेब्रुवारी २०२३ मध्ये करण्यात आली होती. तसे परिपत्रकही काढण्यात आले, या संबंधित गोष्टीला पाहता पाहता दोन महिन्याचा कालावधी निघून गेला व हिंदू धर्मियांचा सण गुढीपाडवा ही आनंदाचा शिधा मिळण्यापासून कोरडाच गेला. त्यामुळे निमंत्रण लग्नाचे निघाली लग्नाला, अन् पोहोचली बारशाला असा आनंदाचा शिधाचा शासन स्तरावरून संथ गतीने प्रवास सुरू असल्यामुळे हा शिधा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी वितरित करावा असे लाभधारकांमधून बोलल्याचे ऐकावयास मिळत आहे.
सदर बाबी संदर्भात कंधार तहसील कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी पुढील प्रमाणे स्पष्टीकरण दिले, कंधार तालुक्यात प्राधान्य कुटुंब कार्ड संख्या ३७३८०, अंत्योदय कुटुंब कार्ड संख्या ३१४७, शेतकरी लाभार्थी कार्ड संख्या ३४५० असे एकूण ४३ हजार ९७७ एवढी स्वस्त धान्य लाभधारक कार्ड संख्या असून कंधार, कुरुळा, बारूळ या तीन ठिकाणी स्वस्त धान्य साठवणुकी गोडाऊन आहेत. या तीनही गोडाऊन मध्ये आनंदाचा शिधा जिनस संच उपलब्ध झाला असून १७६ स्वस्त धान्य दुकानातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी सदरचा चार वस्तूचा शिधा शंभर रुपयात वितरित करणार असल्याचे नायब तहसीलदार (पुरवठा) संतोष कामठेकर यांनी सांगितले.