१६ , १७ मार्च रोजी झालेल्या गारपीट व अतिवृष्टी ने रब्बी पिकांचे वरिष्ठांचे आदेश असूनही पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ सह परिसरात ता.१६ व १७ मार्च रोजी झालेल्या अतिवृष्टीत व गारपिटीने रब्बी हंगामातील गहू , उन्हाळी ज्वारी , भुईमूग , करडी , भाजीपाला , फळबाग तसेच हळद आशा पिकांचे अतोनात नुकसान झाले. हीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यातील अन्य भागातही झालीच होती . यावरून प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कंधार तहसीलदार यांनीही संबंधित भागातील नुकसानग्रस्त भागातील शेती व पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत व अहवाल सादर करावेत असे आदेश देण्यात आले होते , परंतु स्थानिक पातळीवर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवत पंचनामे करण्यात हलगर्जीपणा केला त्या त्यांच्या नाकर्तेपणा चा फटका आता शेतकऱ्यांना बसणार असून याला नेमकं जबाबदार कोण ? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला असून आता याची भरपाई कोण देणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकरी वर्षभर राबराब राबून धरणीमाता देईल तेवढ्यात आपल्या संसाराचा गाडा हाकत असतो. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत असते , अशा नुकसानी चे वेळीच स्थानिक पंचनामे करून तसा अहवाल सादर केल्यानंतर शासन दरबारी काही ना काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. असाच प्रकार याहीवर्षी गेल्या महिन्यात १६ व १७ मार्च रोजी फुलवळ सह परिसरात गारपीट व अतिवृष्टी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी त्या त्या भागातील अपादग्रस्त भागाची व शेतीपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून तसे अहवाल सादर करण्यासंदर्भात त्या त्या विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यावरून कंधार तहसील कार्यालयाकडूनही त्या त्या महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तसे अहवाल सादर करण्यासंदर्भात आदेशीत केले होते. परंतु फुलवळ मंडळात आजपर्यंत कोणताच कर्मचारी सर्व्हे करण्यासाठी फिरकलाच नसून काय तो कार्यालयातच बसून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असल्याचे कळते.
यावरून फुलवळ महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते सुरुवातीला म्हणाले की अहवाल आणखी सादर केलाच नाही. तेंव्हा त्यांना आपल्याकडे सर्व्हे चा आदेश कधी प्राप्त झाला असे विचारले असता ते म्हणाले की मला काही आठवत नाही. पुन्हा तेच म्हणाले की अंदाजे २० मार्च तारीख होती वाटत अशी प्रतिक्रिया दिली. यावरून आपण सर्व्हे केले का ? असे विचारले असता ते माझे काम नाही ते तलाठी , कृषी सहाय्यक , ग्राम विकास अधिकारी यांचे काम आहे असे सांगून त्यांनी हात झटकले.
या सर्व प्रकारावरून शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला असून काल ता. ५ एप्रिल रोज बुधवारी या सज्याचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना गावात बोलावून शेतकऱ्यांनी या सर्व्हे बद्दल जाब विचारला आणि आम्ही जर या नुकसान भरपाई पासून वंचित राहिलो तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला असता गोंधळून गेलेले त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी उपस्थितांचे समाधान न करता काढता पाय घेतला आणि जाताजाता उद्याला पंचनामे सुरू करू असे पोकळ आश्वासन दिले.
गारपीट होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटला , त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी आहे त्या परिस्थितीत गहू पिकाची कापणी करून राशी केल्या , अनेकांनी हळद काढणी ला सुरुवात केली. काही भागातील पिके तशीच आहेत परंतु ज्यांनी पीक शेतीबाहेर काढले त्यांचे काय ? असाही सवाल उपस्थित होत असताना ता. ६ एप्रिल रोज गुरुवारी या सज्याच्या तलाठी श्रीदेवी उस्तुर्गे व कृषी सहाय्यक केंद्रे या दोघी सर्व्हे करण्यासाठी फुलवळ शिवारात दाखल झाल्या. तेंव्हा अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या की नुकसान पिकांचे झाले आता तुम्ही काय काळ्या जमिनीचे पंचनामे करणार आहेत का ? असा सवाल उपस्थित करत जेंव्हा उभं पीक शेतात होत तेंव्हा आपण आला नाहीत आणि आता सर्व अहवाल वरिष्ठांकडे सादर झाल्यानंतर असे काळ्या जमिनीचे पंचनामे करून नेमकं काय साध्य करणार आहात ? असा प्रश्न करत शेतकऱ्यांच्या डोळ्यात काय धूळफेक करत आहात का ? असा संताप व्यक्त केला जात आहे.
आता हे पंचनामे करून जर बाधित शेती व पिकांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण केला जात असून आशा या निष्क्रिय व मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच महसूल प्रशासनाचा दिव्याखाली अंधार , कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकरी बेजार असेच म्हणण्याची वेळ आली आहे.