नांदेड ; प्रतिनिधी
रखरखत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या अबाल वृद्धांना मोफत चप्पल देण्याचा
” चरणसेवा ” या उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचा शुभारंभ सोमवारी हनुमानपेठ परिसरात झाला असून लोकसहभागातून २०२३ चपला वाटण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
गतवर्षी माजी प्राचार्य आत्माराम पळणिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ” चरणसेवा ” हा उपक्रम भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा यांच्यातर्फे राबविण्यात आला. गेल्यावर्षी उन्हाळ्यात २०२२ चपला वाटण्यात आल्या होत्या.यावर्षी कै.बसंवतअप्पा बिचप्पा जोन्नाला रा.संगारेङङी तेलंगाना यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनाली वारले यांच्या तर्फे तसेच आत्माराम पळणिटकर आणि दिलीप ठाकूर यांच्या तर्फे प्रत्येकी १०० नग सुरुवातीला देण्यात आले आहेत.महावीर चौक नांदेड येथील पंचवटी हनुमान मंदिर परिसरात दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून ” भाऊचा माणुसकीचा
फ्रिज ” सहा महिन्यापूर्वी बसवण्यात आला आहे. एकही दिवस खंड न पडता दररोज सकाळी १० वाजता किमान ४० ते १२० जेवणाचे डब्याचे वितरण येथे करण्यात येते. हे डबे घेण्यासाठी अपंग, भिक्षुक, निराधार सकाळी ९ वाजल्यापासून रांगेत थांबलेले असतात. या गरजूना दिलीप ठाकूर, अरुणकुमार काबरा, सविता काबरा, प्रभुदास वाडेकर,हेमंत टेलर यांच्या हस्ते चपला देण्यात आल्या. आगामी दोन महिन्यात वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शासकीय रुग्णालय परिसरात चपला वाटप करण्यात येणार आहेत.तसेच स्वयंसेवकांच्या वाहनात चपलाचे जोड ठेवण्यात येणार असून रस्त्यात कोणी अनवाणी फिरत असल्यास त्यांना मोफत चपला देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या दानशूर नागरिकांनी दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
( छाया : संजयकुमार गायकवाड)