मे महिन्याची दुपार. रणरणतं उन मी म्हणत होतं. सूर्य आग ओकत होता आणि माणसातल्या माणुसकीच्या ओलाव्याला जाळीत होता. त्यामुळे मानवी मनाची कारुण्यता आटत चालली होती. दिवसागणिक समाजव्यवस्थेचा भीषण दुष्काळ तीव्र होत चालला होता. व्यवस्थेने नाकारलेली, नागवलेली, शोषून घेतलेली माणसं शरीरात प्राण आहे म्हणून जगत होती. जनावरांच्या पलिकडचं ज्यांचं जीणं होतं ती माणसाच्या स्पर्शालाही विटाळत होती अशी अस्पृश्य समजलेली, उघडी नागडी बायका, पोरं, गडी माणसं गाडगी, मडकी घेऊन पुण्याच्या रखरखत्या उन्हात मानवी अधिकार आणि निसर्गदत्त हक्क नाकारलेल्या माणसांच्याच जंगलात घोटभर पाण्यासाठी भटकत होती. परंतु निसर्गाने कोणतीही विषमता न बाळगता जीव सृष्टीतील सर्वच जीवजंतूंना प्रदान केलेले निसर्गसौंदर्य धर्मव्यवस्थेच्या ठेकेदारांनी हिरावून घेतलेले होते. या शुद्रातिशुद्रांचे जगणे पिढ्यान् पिढ्यांच्या अंधश्रद्धा, अज्ञान, शोषण, अमानवीयतेच्या अंधारकोठडीत पिचत पडलेले होते.
अशावेळी एक ज्योतीबा त्याच्या लखलखाटासह या जत्थ्यासमोर येतो आणि क्रांतीचा ऊस मुळासकट खाण्यासाठी स्वतःच्याच वाड्यातील पाण्याचा हौद खुला करुन देतो. ‘या! या हौदावर खुशाल पाणी भरा.’
कोण आहे हा क्रांतीबा? एका नव्या क्रांतीयुगाची सुप्रभात उगवायला घालणारा, नव्या समाजरचेनचा क्रांतीसूर्य ज्योतीराव गोविंदराव फुले. ज्या शहराची दशांगुळे धर्ममार्तंडाच्या अनैतिक, अमानवीय समाजबांधणीच्या दलदलीत बरबटलेली आहेत, ज्या शहरातून दुर्गंधीयुक्त गटारगंगा उगम पावते आणि समस्त वृंदावनाचा काळा समुद्र तयार होतो अशा अपौरुषेय धर्मसभेला टक्कर देणारा कर्ता. लग्नाच्या मिरवणुकीत अपमान सहन न झाल्याने संतापलेल्या आणि मनात थैमान घालणार्या विचारांनी ज्योतीबांच्या मनात क्रांतीचे स्फुल्लींग चेतविले. सर्व परिस्थितीचा गांभीर्यपूर्वक विचार करता प्रत्येकच क्षेत्रातील मूठभर लोकांचे प्रभूत्व व वर्चस्वाचे मूळ कशात आहे हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता.
शुद्रातिशुद्र हे मागील अनेक शतकांपासून मानसिक गुलामगिरी आणि पारंपारिक दारिद्र्य का भोगत होते या बंडखोर विचारांची बिजं काळ्या कथित आकाशात वारंवार लखलखतं होती. आजही अस्पृश्यांची ही हालाखी कायम असून तलवारीच्या टोकावरुन ठिबकणार्या थेंबातून आता क्रांतीची बिजं शिवारायला हवीत असे ज्योतीबाला वाटू लागले. त्यांना अपमान विसरायचा नव्हता, बदलाही घ्यायचा नव्हता ती जखमी त्यांना भळभळती ठेवायची होती. जखमेच्या अग्निज्वाळा त्यांना त्यांच्या मनःपटलावर पोसायच्या होत्या.
समाजातील भयंकर चालीरीती, धर्माच्या नावाखाली समाजमनावर ज्या दुष्ट नि निष्ठूर परंपरा, रुढी जन्माला आल्या होत्या, त्यांच्या विरुद्ध युद्धाचे रणशिंग फुंकणे आवश्यक होते. मानवतेला पारतंत्र्याच्या साखळदंडाने कायम गुलामगिरीच्या जोखडात जेरबंद करण्यात आलेल्या धर्मसत्तेला नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी चंगच बांधला. विचाराअंती त्यांचे मनोबल वाढले. धैर्यनिष्ठा वाढली. साहसी, पराक्रमी योद्ध्याचे झुंजारलेपण त्यांच्या अंगी आले. खर्या अर्थाने एका नव्या युद्धपर्वाची सुरुवातच झालेली होती. पण आता हे कसे करायचे? कसे ठरवायचे? युद्ध चळवळीचे अंतिम नियोजन कसे करायचे? याचे उत्तर आपसूकच गवसले. समाजसुधारणेची सुरुवातच घरापासून करायची. धर्मसत्तेला हादरे देण्याचा युगप्रारंभ आपल्या घरातल्या स्त्रीपासूनच करायचा. मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे सारसूत्र हे शिक्षण हेच आहे, हे त्यांना कळून चुकले होते. इतके अनर्थ एका अविद्येनेच केले आहेत हे बुद्धज्ञान त्यांना उमगलेले होते. म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या युगनिर्मात्या साम्राज्ञीला क्रांतीयुद्धाची सरसेनानी बनविले.
काळाच्या आक्राळ-विक्राळ जबड्यात हात घालून प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देणारी झुंजार क्रांतीमाई इतिहासाने पाहिलेली आहे. कारण जगाच्या आयुष्यातील सन १८४८ हे क्रांतीकारी महान वर्ष वैश्विक इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे. त्याचे पडसाद पुण्यातल्या भिडेवाड्यात पडले. भिडेवाडा अजरामर झाला. नवशिक्षिकेच्या पदस्पर्शाने पावन झालेली मुलींची पहिली शाळा सुरु झाली. ज्योतीबांचा जन्म मानवी योनीतून नैसर्गिकरित्या १८२७ मध्ये झालेला असला तरी १८४८ मध्ये त्यांचा खर्या अर्थाने नवा जन्म झाला, असे म्हणता येईल.
ज्या विद्येविना मती नष्ट झालेली होती. ती विद्याच तत्कालीन समाजरचनेत स्त्रिया व अतिशुद्रांना नाकारलेली होती. मुलींना शिक्षण देणे म्हणजे पाप समजले जात होते. शुद्रातिशुद्रांची स्थिती ह्यापेक्षा वेगळी नव्हती. समाजात मानवा-मानवात भेद करणारी एक व्यवस्थाच कार्यरत होती. उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य असे भेदभाव होते. अस्पृश्यांच्या सावलीचा विटाळही मानला जात होता. त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिल्या जात होती. त्यांना मुलभूत अधिकारच नाकारण्यात आलेले होते. कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले नव्हते. त्यांच्यापेक्षा उच्चवर्गाची सेवा करणे शुद्रातिशुद्रांचे काम होते. सार्वजनिक पाणवठा, विहिरी, तळी, मंदिरे, शाळा या ठिकाणी अस्पृश्यांना बंदी होती. त्यांचा स्पर्शही अपवित्र मानल्या जात होता. तेंव्हा शिक्षणाचा विषय तर त्यांच्यापासून कोसो दूर गेलेला होता. अशावेळी १८५२ मध्ये महार-मांग इत्यादींना शिकविणारी मंडळी ह्या संस्थेच्या अधिपत्याखाली अस्पृश्यांसाठीही ज्योतीबा फुले यांनी शाळा काढली. ते स्वतः अस्पृश्यांच्या वस्तीत राहायला गेले. माणुसकीचा खरा धर्म त्यांनी समाजाला शिकविला अशाप्रकारे तळागाळातील लोकांच्या शिक्षणाला व स्त्री शिक्षणाला गती देण्याचे काम ज्योतीबा फुल्यांनी केले.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या ज्योतीबांच्या क्रांती चळवळीत त्यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले ह्या भक्कमपणे उभ्या होत्या. ज्योतीबांची ही प्रकृती दुधारी तलवार होती. साहसी वृत्ती, दूरदृष्टी, दृढनिश्चयी स्वभाव यामुळे ज्योतीबांचे नेतृत्व फळाला गेले. त्या केवळ त्यांच्या वैवाहिक जीवनातील अर्धांगिणी नव्हत्या तर सामाजिक व शैक्षणिक चळवळीतही कायम सोबतीला होत्या. शेतकरी, शेतमजूर, दीन, दुबळ्यांची मुले, स्त्री-शुद्रांच्या समाजसेवेचे कार्य त्यांनी फार आत्मीयतेने केले. फुले दाम्पत्यांनी केवळ शाळाच काढल्या नाहीत तर बालविवाह प्रतिबंध, विधवा विवाह, सतीची चाल, बालहत्या प्रतिबंधक गृह, शिक्षण, शेती अशा सर्वच कार्यात स्वतःला वाहून घेतले. ते बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. ते जे बोलत असत, ते करुन दाखवत हा प्रवासच अत्यंत खडतर होता.
शाळेत जाता-येता जो त्रास त्यांना होता त्याहीपेक्षा जास्त त्रास केसांचे मुंडन केलेल्या दाराआड दिसणार्या स्त्रियांमुळे त्यांना व्हायचा. या स्त्रियांचा कौटुंबिक छळ नियमबद्ध होता. ते प्राक्तनाचे भोग म्हणून भोगत होत्या. ज्योतीबांच्या शाळेतील चौदा वर्षाच्या पोरसवदा मुक्ता साळवे या मातंग समाजातील मुलीने निबंध लिहून समाजव्यवस्थेला घाम फोडला. चळवळ अशा रितीने क्रांतीच्या दिशेने अग्रेसर होत होती.
स्त्रियांना समाजात उजळ माथ्यानं जगता यावं ह्यासाठी फुले दांपत्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरु केले. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची हत्या तर व्हायचीच पण स्त्रिला निचा काहीच दोष नसताना जीवंतपणीच मरणयातना भोगायला लागायच्या. याच ठिकाणी काशी नावाच्या स्त्रीचा मुलगा यशवंत त्यांनी दत्तक म्हणून स्विकारला. शुद्रातिशुद्रांसाठी वसतिगृह सुरु केले. विधवा केशवपनासारखी दुष्ट पद्धत बंद करण्यासाठी पुणे, मुंबई भागातील न्हाव्यांची एक परिषद घेऊन त्यांच्या हातून जे कुकर्म घडत आहे त्याची जाणीव त्यांना करुन दिली. त्यामुळे केशवपना विरोधात त्या भागातील न्हाव्यांनी संप केला. सामाजिक समतेच्या पुनरुत्थानासाठी जोतीरांवानी सन १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीभेद निर्मुलन, व्यक्तीस्वातंत्र्य, मानवता व बंधुता, न्याय व समता ही मूल्ये रुजविण्यासाठी अखंड सत्यशोधक चळवळ उभी केली. दुष्काळाच्या काळात फुले दाम्पत्यांनी मिळेल तेथून अन्नधान्य जमविले व अन्नछत्रे स्थापन केली.
ज्योतीराव फुले मानवतेचे सौंदर्य होते. त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केलेली असली तरी ते तमाम तळभारताचे क्रांतीपिता म्हणजेच क्रांतीबा आहेत. आजही ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आपल्यात जीवंत आहेत. सन १८९० साली जोतीरावांचे दुःखद निधन झालेले असले तरी त्यांनी फुले नंतर शाहू आणि आंबेडकर ही क्रांतीची बिजं त्यांच्या मळ्यात पेरुन ठेवलेली होती.
फुले-शाहू-आंबेडकर हे क्रांतीचे त्रिशरण आहेत. क्रांतीबांना त्यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३