कंधार :- ( धोंडीबा मुंडे )
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या धर्तीवर कंधार शहरात भव्यदिव्य असे प्रति भगवानगड साकारत असून यासाठी विविध समाजातून सढळ हस्ते सहकार्य मिळत आहे.
राष्ट्रीय संत ह.भ.प भगवानबाबा यांनी वैराग्य पत्करून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केलेले होते.त्यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन समाजातील गोरगरिबात शिक्षणासाठी कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली.समाजातील काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचेवर आळ घेतल्यामुळे स्वतःचे लिंग कापून नैराश्याने हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना मानणाऱ्या भक्तांनी विनंती करून त्या काळच्या धौम्यगडावर भगवान बाबांना थांबण्याचा आग्रह केला . जो की, आजचा भगवानगड म्हणून प्रसिद्ध आहे.त्यानुसार बाबांनी तेथे आपले बस्तान मांडून अविरत समाज उन्नतीचे शेवटपर्यंत कार्य केले.
त्यांच्या हयातीनंतर ह. भ. प .भीमसिंह महाराजांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले भगवान बाबांचे प्रत्येक जाती धर्मात अनेक भक्तगण होते व आजही आहेत. त्यांच्या भक्तगणांपैकी राष्ट्रीय नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ही होते भगवानगडाचा विकास करणे हा एकच ध्यास घेऊन उपमुख्यमंत्री असताना त्याकाळी दोन कोटी रुपयांचा निधी देऊन गडाचा विकास करत कायापालट करण्यात आला .तेथे दरवर्षी दसऱ्याला मेळावा घेत समाज संघटन करण्याचे काम मुंडे साहेबांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रात भगवान गडाच्या धर्तीवर एकमेव प्रशस्त गड तयार करण्याचा कंधार तालुक्यातील समाज बांधवांनी संकल्प करून कंधार शहरात प्रति भगवानगड स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला त्यानुसार भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठानची स्थापना करून समाजातील विविध दानशूर व्यक्तींकडून मदत घेत ०-६३ आर (दिड एकर) जमीन इस २००२ ला विकत घेतली .०८ जून २००३ रोजी भगवान गडाचे तत्कालीन मठाधिपती ह.भ.प.भीमसिंह महाराज यांचे हस्ते मंदिराचे पायाभरणी कार्यक्रम घेण्यात आला. परंतु आर्थिक उभारणीच्या अडचणीमुळे मंदिराचे काम प्रलंबित पडले होते.
त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी शिफारस करून तत्कालीन राज्यसभेचे भाजपचे खा.वेदप्रकाशजी गोयल यांचे स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचा निधी देऊन एक सांस्कृतिक सभागृहाची उभारणी केली.नंतर या गडावर जाण्यासाठी रस्ता नव्हता तेव्हा माजी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन नगराध्यक्षा सौ.अनुसया केंद्रे यांना सूचना करून घोडज रोड ते भगवानगड कंधार हा सिमेंट रस्ता करून दिला .तसेच माजी आ.शंकर अण्णा धोंडगे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचे सांस्कृतिक सभागृह बांधून दिले.
तसेच संस्थेच्या वतीने जागेच्या चहुबाजूने सागवान झाडांची लागवड करण्यात आली असून ही झाडे सद्यस्थितीत परिपक्व झाली आहेत.
या जागेत समाजातील भक्तगणांनी गेली आठ वर्षापासून सतत अखंड हरिनाम सप्ताह चालू केला असून या कार्यक्रमाचा परिसरातील भाविक लाभ घेत आहेत. या कार्यक्रमाला येणारे कीर्तनकार व भागवत कथाकार दरवर्षी भगवान बाबा व विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्याचे आवाहन करत होते. त्यानुसार यावर्षीचा सप्ताहाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेत मंदिर उभारणीचा संकल्प केला व १८ फेब्रुवारी २०२३ महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अवधूत गिरी महाराज बाचोटी कर व नामदेव महाराज दापके कर यांचे हस्ते पूजा करून प्रत्यक्ष मंदिर बांधकामास सुरुवात करण्यात आली.आत्तापर्यंत अनेक दानशूर व्यक्तींनी वस्तुरूपाने व रोख स्वरूपात मदत केली असून त्यामुळे तळघरातील भगवान बाबाच्या मंदिराचे काम पूर्ण झाले असून येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल २०२३रोजी पहिला छत टाकण्यात येणार असून त्यानंतर लगेचच वरील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बांधकाम सुरूच राहणार आहे. हे भव्य दिव्य मंदिर कंधार-लोहा ,तसेच नांदेड जिल्ह्याचे आकर्षण राहणार असून या बांधकामास विविध जाती धर्मातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठान कंधारचे वतीने करण्यात येत आहे.