नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज १४ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वा महाबुद्धवंदना कार्यक्रम होणार आहे. येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या आणि भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली महाबुद्धवंदना संपन्न होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिली.
भीमजयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहे. ‘पंचशीलेचे तत्वज्ञान’ या विषयावर भदंत पंय्याबोधी थेरो यांची धम्मदेसना संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपासक उपासिका बालक बालिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.