होय मी विधानसभा निवडणुक लढवणार, तुम्ही मला फक्त साथ द्या….!फुलवळ येथील महादेव मंदिरात एकनाथ पवार यांनी घेतली शपथ.

 

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

लोहा/कंधार विधानसभा मतदारसंघाचा सातबारा हा जणू माझ्याच नावाचा आहे असे समजून राजकारण करणाऱ्यांनी मतदारसंघातील विकास कामे व मूलभूत सुविधा देण्याऐवजी जनतेची दिशाभूल करून अविर भावात वागत आहेत त्यांना माझे आव्हान आहे कारण माझ्याही बापाचा सातबारा याच मतदारसंघात आहे हे विसरू नका
असे म्हणत होय मी विधानसभा निवडणुक लढवणार,तुम्ही मला फक्त साथ द्या अशी फुलवळ येथील महादेवाच्या मंदिरात एकनाथ पवार यांनी शपथ घेतली. तसेच या मतदारसंघात मोठी विकास कामे करत असल्याची वल्गना करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोणाचे नाव न घेता एकनाथ दादा पवार यांनी मत व्यक्त केले.

 

ता.१६ एप्रिल २०२३ रोज रविवारी सूर्योदय मन्याड फाउंडेशन चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली फुलवळ येथील महादेव मंदिरात कार्यकर्ता मेळावा व सर्कलमधील पदाधिकाऱ्यांची निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूर्योदय मन्याड फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष बालाजी परदेशी, दत्ताभाऊ शेंबाळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किसान मोर्चा भाजपा, शिवसांब देशमुख, सुदर्शन जाधव, नाना चिवळे, सुंदर सिंग जाधव, गजानन मोरे, टोंगे ब्रह्मानंद पाटील, डॉ.प्रदीप सिंह राजपूत, परमेश्वर डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

पुढे बोलताना पवार म्हणाले या मतदारसंघात शिक्षण, आरोग्य, लाईटचा प्रश्न ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून येथील उच्च सुशिक्षितांवर बेरोजगारीची वेळ आल्यामुळे ते तरुण बेरोजगार चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. या आपल्या मतदारसंघातील मूलभूत गरजा आहेत आणि त्या सोडविणे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी यांनी वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. अशाने या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे.

कंधार हे एकेकाळी राजधानीचे शहर होते, या शहराची आज काय अवस्था झाली आहे. सायंकाळी आठ वाजताच पूर्ण शहर सामसूम होऊन संपूर्णतः मार्केट बंद होते आणि येथील व्यापारी नैराश्यग्रस्त अवस्थेत जीवन जगत आहेत असे हाल या कंधार शहराचे झाले आहे, हे आपण सर्वजण पाहत आहोत हे मला सहन होत नाही. मला पोट भरण्यासाठी राजकारण करायचं नाही तर या मतदारसंघात सर्व मूलभूत सुविधा पुरवून एक विकासाचा मॉडेल म्हणून या मतदारसंघात बदल घडवून आणण्याचे माझे स्वप्न आहे.

मला या मतदारसंघातील विकास कामाची भूक लागली आहे. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा येणाऱ्या विधानसभेत निवडून येणारा भावी आमदार हा एकनाथ पवारच असेल आणि या मतदारसंघाचे वेगळे मॉडेल बनवणारच असा विश्वास त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ताभाऊ शेंबाळे यांनी केले या मेळाव्यासाठी कंधार-लोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *