फुलवळ ग्राम पंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले दोन्ही जलशुद्धीकरण यंत्र धूळ खात ; फुलवळ ग्रामपंचायत उंटावरून शेळ्या हाकतेय की काय..?

फुलवळ(धोंडीबा बोरगावे)

ग्रामीण भागात राहणाऱ्य ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहावे व त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शासन स्तरावरून विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्यासाठी शासनाकडून निधीचीही मुबलक उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून दिली जात आहे. परंतु या योजनेसाठी दिलेल्या निधीचा योग्य वापर होणे अपेक्षित असताना केवळ स्वार्थापोटी राबवलेल्या अशा योजना केवळ निधी खर्च होईपर्यंत कागदावर चालू असल्याच्या दिसून येतात आणि काही दिवसाच्या आतच त्या बंद पडून धूळखात पडत असलेल्या अवस्थेत दिसून येतात. , असाच प्रकार कंधार तालुक्यातील फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत घडल्याचे दिसून येते.

फुलवळ हे गाव जिल्हा परिषद सर्कलचे असून येथील लोकसंख्या जवळपास सहा हजारांच्या आसपास आहे. येथील ग्रामपंचायत ही ११ सदस्यांची आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत दोन तांडे महादेव तांडा , केवळा नाईक तांडा व एक सोमासेवाडींचा समावेश आहे. या गावची लोकसंख्या व ग्रामपंचायत चा विचार करता शासन स्तरावरून विविध हेड खाली निधी प्राप्त करून दिला आहे. जि.प. समाज कल्याण विभागाअंतर्गत दलित वस्तीच्या माध्यमातून या भागातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ३ लक्ष रुपये निधी देऊन एक जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले व दुसरे पंधराव्या वित्त आयोगातून खर्च करून ग्रामपंचायत कार्यालयात दुसरे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. हे दोन्ही ही जलशुद्धीकरण यंत्र मर्यादित काळापर्यंत च चालू राहिले परंतु गत आठ महिन्यांपासून ते दोन्ही बंद असून धूळ खात बंद अवस्थेत पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना खाजगी जलशुद्धीकरण यंत्राचे पाणी विकत घ्यावे लागत असून ते परवडत नसल्यामुळे हे जलशुद्धीकरण यंत्र ‘असून अडचण नसून कोळंबा’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचे दिसून येत आहे.

सदर ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली लाखो रुपये उचलून ते खर्चही केले परंतु तो खर्च निरर्थक झाला असून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मात्र वेळेवर मिळत नाही, ही शोकांतिका असून शासकीय योजना या लोककल्याणासाठी आहेत का सदर काम करणाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून निधी हडप करण्यासाठी आहेत ? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *