लोहा/ प्रतिनिधी
तालुक्यातील डोणवाडा ग्रामपंचायतचे वादग्रस्त ग्रामसेवक श्री.पि. बी. शिनगारे हे ग्रामपंचायत कार्यालय डोणवाडा येथे गेल्या अनेक दिवसापासून गैरहजर असून जनतेचे अनेक प्रलंबित प्रश्न असल्याने ग्रामसेवक शिनगारे यांना उपसरपंच डोणवाडा सौ. अनुराधा हनुमंत जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालय डोणवाडा येथे यावे असे फोनवरून बोलले असता ग्रामसेवक शिनगारे यांनी उपसरपंच जाधव यांना उडवाउडविची उत्तरे दिली, एक आठवड्याचा कालावधी गेल्यानंतर उपसरपंच जाधव यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा यांना ग्रामसेवक शिनगारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करा म्हणून लेखी तक्रार निवेदन दिले आहे .
ग्रामसेवक शिनगारे यांनी शासनाची दिशाभूल व फसवणूक केली असून शासकीय नियमांना फाटा देत पंचायत समिती कार्यालय लोह्याला कोणतीही रीतसर रजा न देता गेल्या आठ दिवसापासून ग्रामसेवक शिनगारे हे डोणवाडा ग्रामपंचायत येथे गैरहजर असून गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून ग्रामसेवक शिनगारे यांना तात्काळ निलंबित करण्याचे मागणी डोणवाडाचे उपसरपंच सौ.अनुराधा हनुमंत जाधव यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत,
लोहा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी डी. आय .गायकवाड या संवेदनशील प्रकरणांमध्ये येणाऱ्या काळात कोणती भूमिका घेतील याची उत्सुकता आहे.