Post Views: 57
नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दरमहा पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बुद्ध जयंतीनिमित्त आज १९ मे रोजी सकाळपासूनच परित्राणपाठ, धम्मध्वजारोहण, त्रिरत्नवंदना, बोधीपुजा, सूत्तपठण, ध्यानसाधना, धम्मदेसना, व्याख्यान, भोजनदान, आर्थिक दान पारमिता आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक, आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बुद्ध जयंतीनिमित्त आज पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. बुद्ध जयंती हे पर्व वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची मानले जाते.
बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष आहे. हा विशेष योगायोग म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते. त्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये बुद्ध पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या निमित्ताने १९ मे रोजी सकाळपासूनच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.