नांदेड; प्रतिनिधी
सध्या नांदेड धुमाकूळ घालत असलेला जादूगार प्रिन्स हा अनोखा कार्यक्रम शहरातील अनाथ मुले, मुली तसेच दिव्यांग मुले व त्यांच्या एका पालकांसाठी शुक्रवार दि.२ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे मोफत दाखविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
या जादूच्या खेळामध्ये स्टेजवर भयानक गोरिला प्राणी अवतरणार आहे. तसेच रंगमंचावर इच्छाधारी नागिन येणार आहे. लाखो रुपयाचा पाऊस पाडण्यात येणार आहे. जादूगार प्रिन्स हे फिरत्या पंख्यातून आरपार जाऊन सर्वांना चकित करणार आहेत. अशी विविधता असलेला हा शो भाजपा नांदेड महानगर,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ यांच्या तर्फे मोफत दाखविण्यात येणार आहे. लहुजी साळवे अनाथाश्रम,मूकबधिर विद्यालय, मतिमंद विद्यालय तसेच सुमन बालगृह येथील मुला मुलींना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय नांदेड शहरात अनेक दिव्यांग मुले राहतात. त्यांच्या खडतर आयुष्यात काही क्षण आनंदाचे जावे या उद्देशाने दिलीप ठाकूर यांनी हा नवीन ८३ वा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी ही कल्पना जादूगार प्रिन्स आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. जुगल धुत यांच्या कानावर टाकली असता सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध झाले आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्यासह विश्वजीत मारुती कदम धानोरा आणि गोविंद जिगळे किवळेकर अलिबाग, अमित शंकरराव पाटील, व्यंकट अन्नदाते यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. शो पाहण्यासाठी येताना मुलांनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे. एका दिव्यांग मुलासोबत फक्त एका पालकाला प्रवेश देण्यात येईल. जादूचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या सर्वांना रोटरी क्लब नांदेडतर्फे किशोर पावडे यांच्या पुढाकारातून पार्ले बिस्कीट वाटप करण्यात येणार आहे. तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.