राज्यकर्त्यां- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

 

महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी आहे त्याचप्रमाणे विरांगणाची देखील भूमी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक विरांगणा होऊन गेल्या. माॅं. साहेब जिजाऊ, संत जनाबाई,सावित्रीबाई फुले ,ताराबाई शिंदे, बहिणाबाई चौधरी, अश्या कितीतरी नावे आपल्याला घेता येतील, की ज्या महिलांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्या विरांगणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एक महिला असून देखील एक कर्तबगार राज्यकर्ती कशा होत्या.
३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर जयंती असल्याने सर्वत्र ती उत्साहाने आणि विविध उपक्रम राबवून साजरी केली जाते.
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी या अगदी छोट्या खेडेगावांमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे आणि आईचे नाव सुशिलाबाई होते. अगदी लहान वयातच त्यांचा विवाह माळवा प्रांतात जहागिरी असलेल्या मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला.त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ आठ वर्षांच्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांची मराठा दरबारी एक वेगळी ओळख होती त्या मानाने पती खंडेराव हे आयुष्य आरामात जीवन जगणारे गृहस्थ होते. त्यामुळे अनेक जबाबदऱ्या अहिल्याबाई यांच्यावर पडल्या.
१७५४ ला झालेल्या कुंभेरच्या लढाईत अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर मारले गेले. पतीच्या निधनानंतर त्याकाळी स्त्रीने सती जाण्याची प्रथा होती.” तरुण वयात आपला मुलगा गेला आणि त्याच्या माघारी आपली सुन देखील सती जाणार. मग हे एवढे मोठे साम्राज्य कोण पाहणार. मी कायम मोहिमेवर असतो तसेच लहान लहान नातवंडांचा सांभाळ कोण करणार ?” या विचाराने अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ नये अशी विनंती केली. आणि तेव्हा पासूनच मल्हारराव यांच्या खांद्याला खांदा लावून एक महिला असून देखील एक उत्तम राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर यांनी काम पाहिले. मल्हाराव होळकर वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सहभागी होत असल्याने त्यांच्या जहागिरीचा सर्व कारभार त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती सोपवली होती.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर एक महिला त्यातही विधवा परंतु राज्यकारभार पाहत असताना त्या कधीच मागे हटल्या नाहीत.त्यांनी अतिशय कठोरपरिश्रम घेतले आणि आपला राज्यकारभार लोककल्याणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने केला. तो कारभार करत असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले ते असे….
1. राजधानीचे ठिकाण –
अहिल्याबाई होळकर यांनी इंदूर या ठिकाणी असणारी आपली राजधानी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या महेश्वरला नेली.तिथे आपले प्रशासन नीट पाहता यावे यासाठी एक प्रशस्त असा राजवाडा बांधला. या राजवाड्यात खूप मोठे देवालय म्हणजेच देवघर बांधले.होळकर घराण्यातील कर्तबगार व्यक्तींचा आठवण म्हणून आपल्या राजधानीमध्ये त्यांच्या नावाने छत्र्या बांधल्या आपल्या पूर्वजांचा पराक्रम या माध्यमातून जीवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले.
2. नद्यांवरती घाट बांधणी-
अहिल्याबाई होळकर यांनी पाण्याचे महत्व ओळखून ते पाणी योग्य कामासाठी वापरले जावे यासाठी त्यांनी नद्यांवर ती मोठमोठे घाट बांधले.नदीकिनारी मंदिर असेल तर भक्तजणांना या घाटावर अंघोळीची उत्तम सोय त्या निमिताने झाले. असा दुहेरी फायदा हा घाट बांधण्याचा झाला.
3. मंदिरांचा जीर्णोद्धार –
शिवकाळात किंवा त्याअगोदरच्या काळात बांधली गेलेली अनेक पुरातन मंदिरे जीर्ण झाली होती. या मंदिरांना लकाकी आणण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला विशेष सांगायचे म्हणजे आज आपण जो जेजुरी किल्ला किंवा मंदिर पाहतो याची संपूर्ण डागडुजी करण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले आहे. आजही हा मल्हारगड अगदी दिमाखात उभा आहे. यातून अहिल्याबाई होळकर यांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते.
4. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे –
आपल्या राज्यातील गोरगरीब अनाथ लोकांना किमान दोन वेळचे खायला मिळावे यासाठी अहिल्याबाई होळकर यांनी ठिकाणी अन्नछत्रे सुरू केली व त्यात जातीने लक्ष देखील घातले.
5. पिण्याच्या पाण्याची सुविधा –
अहिल्याबाई होळकर यांनी अनेक विहिरी आड नुसते खोदण्यास नाही तर ते खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पक्क्या स्वरूपात बांधून घेण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले त्याचबरोबर रस्त्याने जाणारे वाटसरु त्यांच्या सोयीसाठी ठिकाणी पाणपोया सुरू केल्या.
6. ग्रंथ संकलन आणि वाचन –
अहिल्याबाई होळकर या आध्यात्मिक होत्या त्यांना धार्मिक ग्रंथ वाचनाची प्रचंड आवड होती.त्यांनी निर्णयसिंधु ज्ञानेश्वरी वाल्मीकि रामायण असे अनेक ग्रंथ आपल्याकडे संग्रही करून ठेवले होते. कदाचित यामुळेच अनेक पुण्याची कामे करण्यावर कायम त्यांचा होता.
7. दरोडेखोरांचा सामना –
सासरे मल्हाराव होळकर यांच्या निधनानंतर राज्यात अनागोंदी निर्माण झाली होती ठिकठिकाणी चोर्‍या,दरोडे यासारख्या घटना घडत होत्या.आता काय करावे या प्रश्नाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चींतीत होत्या यावर उपाय म्हणून त्यांनी आपली मुलगी मुक्ताबाई तिला पणाला लावले.आणि जो कोणी मुलगा त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल यासाठी स्वयंवर केला. खरोखरच माझ्या काळजाच्या तुकड्या पेक्षा माझी जनता प्यारी ही भूमिका अहिल्याबाई होळकर यांच्याजवळ होती या उदाहरणातून त्या एक उत्तम राज्यकर्ती होत्या. हे पटवून देणारी ही घटना आहे आणि त्या पुढे झालेही तसेच त्यांच्या जावयाने दरोडेखोरांचा बंदोबस्त केला.
8. पंचांची नेमणूक –
अहिल्याबाई होळकर यांना जाणीव होती की प्रत्येक वेळी सर्वसामान्य लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नाही परंतु त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. याच भूमिकेतून त्यांनी गावागावांमधून पंचांची नेमणूक केली आणि लोकांच्या समस्या दूर करण्यावर भर दिला. हे पंच आपले काम नीट पार पडत आहेत का ?याची त्या स्वत खात्री करून घेत.
9. औषधोपचाराची सोय –
अहिल्याबाई होळकर यांनी जाणले की अनेक लोकवेळेवर उपचार वेळेवर घेत नसल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. अश्या घटनांमुळे किती लोक मरण पावत आहेत यावर उपाय म्हणून त्यासाठी विशेष अशा व्यक्तींची नेमणूक केली.
10. करमुक्त शेती –
अहिल्याबाई होळकर यांच्या अगोदर जे राजे होऊन गेले ते राजे शेतीवर कर गोळा करत होते तो कर बंद करण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले.
11. शिक्षणाची सोय –
अहिल्याबाई होळकर यांना स्वतः लिहिता-वाचता येत असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले होते आणि त्यासाठी त्यांनी शिक्षणाची सोय केली.जागोजागी छोटे छोटे वर्ग सुरू केले.
12. सती प्रथा बंद –
सासरे मल्हारराव होळकर यांचे विनंती नुसार अहिल्याबाई होळकर सती गेल्या नाहीत तर त्यांना राजकारभारायमध्ये मदत करू लागल्या. ती मदत करत असताना आपल्या राज्यातील सतीची चाल पूर्णपणे बंद झाली पाहिजे यासाठी त्यांनी हट्ट धरला आणि अखेर शेवटी सतीची चाल बंद केली.
13. सर्वधर्म समभाव –
राज्यकारभार पाहात असताना अहिल्याबाई होळकर यांनी अमुक एकच धर्म श्रेष्ठ अशी भूमिका कधीच घेतली नाही. तर सर्व धर्म हे श्रेष्ठच आहेत अशी त्यांची भूमिका होती.ज्याप्रमाणे त्यांनी जेजुरी, नाशिक,आयोध्या या ठिकाणी मंदिरे बांधली त्याच पद्धतीने अनेक मशिदी व दर्गे यांचीदेखील बांधणी केली. यातून अहिल्याबाई होळकर एक उत्तम आणि कर्तबगार राज्यकर्ती होत्या याची आपल्याला कल्पना येते.
14. सर्वांसाठी समान कायदा –
राज्यकारभार करीत असताना काही छोटी-मोठी प्रकरणे घडली,काही तक्रारी प्राप्त झाल्या तर न्याय देत असताना जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे व जो निरपराध आहे तो सहीसलामत सुटला पाहिजे अशी भूमिका अहिल्याबाई होळकर यांची होती. कायदा सर्वांना सारखा असा कारभार त्यांचा होता.
15. अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने अहिल्याबाई होळकर मुलीना मोफत बस पास योजना व अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या योजना सुरू आहेत.
यासारखी कामे केली म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हटले जात होते. वरील कार्ये पाहिल्यांनातर पुण्यश्लोक अहिल्याबाई कर्तबगार राज्यकर्ती होत्या हे समजलेच असेल.
अश्या राज्यकर्त्यां स्त्री शक्तीला कोटी कोटी नमन.

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *