फुलवळ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील ज्ञानेश्वर वाघमारे हे तसे फुलवळ चे जावई , परंतु गेल्या अनेक दिवसांपासून फुलवळ येथेच वास्तव्यास असून आता ते फुलवळचेच स्थायिक झाले. ते अनेक वर्षांपासून कंधार येथील तर आजघडीला फुलवळ येथील आडत दुकानात व्यवसायाने हमाली करतात. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या अर्धांगिनी सौ. गयाबाई ज्ञानेश्वर वाघमारे याही त्यांच्यासोबतच त्याच आडत दुकानात लागेल तो कामधंदा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे जोडपं आजही करतात.
त्यांना तसे दोन मुलं , दोन मुली आहेत , त्यात राजेश्वर हा मोठा तर विजय हा छोटा मुलगा. आईवडिलांचे दैनंदिन जीवनातील काबाडकष्ट पाहून जिद्दीला पेटलेल्या विजय वाघमारे ने गेले काही दिवसांपासून अपार मेहनत घेत दररोज चिकाटीने अभ्यास , व्यायाम सोबतच दैनंदिन वर्तमानपत्र वाचून कुठे काही जाहिराती आहेत का ? याचा मागोवा घेत विविध भरतीची तयारी करायला सुरुवात केली. त्यातच काही दिवसांपूर्वी त्याने बीएसएफ ची परीक्षा दिली होती त्यात तो उत्तीर्ण झाला असून नुकतेच त्याची फायनल निवड यादी प्रकाशित झाली आणि त्यात विजय वाघमारे ची निवड झाली.
आता या कुटुंबाच्या गगनात आनंद मावेनासा झाला असून जिद्दीने पेटलेल्या हमाल कामगाराचा मुलगा विजय वाघमारे ने अखेर आईवडिलांचे स्वप्न साकार केले असल्याने व त्याची निवड झाल्याने सर्वच स्तरातून विजय वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व त्याने घेतलेल्या आपर मेहनतीचे इतरांनी आदर्श घ्यावा व आपणही आपले स्वप्न साकार करत आपापल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनावे अशीच चर्चा अनेकांकडून ऐकायला मिळत आहे.
या मुलाने घरची हालाकीची परिस्थिती अनुभवत गेली २०१८ पासून विविध स्पर्धेची तयारी करत असल्याचे विजय ने सांगितले असून यासाठी आपणाला वेळोवेळी मुंडे करिअर अकॅडमी चे योगेश मुंडे सरांचे मार्गदर्शन मिळाले तसेच त्यांच्याकडून धैर्य न खचू देता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत पुढचे पाऊल कसे टाकायचे याचे गुरुमंत्र वारंवार मिळत गेले तसतसा मी घडत गेलो अशी प्रतिक्रिया देताना आईवडिलांची पुण्याई आणि सोबतच मी जमेल तशी घेतलेली मेहनत अखेर फळाला आली असून आज मी महाराष्ट्र रँक मध्ये ७३ वा क्रमांक मिळवून बीएसएफ साठी पात्र झालो असे सांगत आईवडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आनंद सर्वात जास्त होतोय अशी पुष्टी देत आजपर्यंत मनाशी बांधलेली गाठ म्हणजे हे ही दिवस निघून जातील याच दृढ निश्चयाने मेहनत करत गेलो त्याचेच फलित आज मिळाल्याचा आनंद माझ्यासह माझ्या कुटुंबातील सर्वांना आहे असल्याचे त्यांनी सांगितले.