नांदेड: प्रतिनिधी
चांगले जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने चांगल्या माणसांसोबत राहिले पाहिजे, चांगल्या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, वाचनामुळे माणसात आमुलाग्र बदल घडून येतो, वाचनाने माणसाचे मस्तक घडते त्यामुळे वाचन संस्कृती रूजली पाहिजे असे मत लक्षवेध फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष , सिने अभिनेते तथा माजी सनदी अधिकारी अनिल मोरे यांनी व्यक्त केले.
दि.१२ जून रोजी शहरातील हॉटेल राजयोग, नमस्कार चौक नांदेड येथे युवा साहित्यिक, ग्रंथ प्रेमी सोनु दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त, भारताचे संविधान आणि असंख्य ग्रंथ ठेवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम नाविन्यपूर्ण होता. प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि ग्रंथदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सनदी अधिकारी अनिल मोरे ते बोलत होते.
पुढे बोलताना अनिल मोरे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधले, त्यांनी हजारो ग्रंथांचे वाचन केले त्यामुळे आज जगभरात त्यांचे नाव आहे. प्रत्येकानी राज्यघटनेचे वाचन केले पाहिजे, बाबासाहेब हे एक विचार आहेत ते प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. मात्र हल्ली बाबासाहेबाना एका विशिष्ठ जातीत बांधून ठेवल्या जात आहे हे मोठी शोकांतिका म्हणावे लागेल, तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रगल्भ ज्ञान पाहता ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर याचा अधिक आनंद झाला असता कारण त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला झाला असता, असे ते म्हणाले.
सत्कर्म केल्याने निर्भयता येते. त्यामुळे प्रत्येकाने सत्याचा आधार घेऊन ज्ञानाची इमारत उभारावी. आज वाचन संस्कृती नष्ट होत असताना सोनु दरेगावकर यांच्या सारखे ग्रंथप्रेमी युवक ती वाचनसंस्कृती टिकून ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. त्यामुळे सोनु दरेगावकर यांच्यासारख्या विचाराचे वारसदार तयार झाले पाहिजे. सोनु यांनी अगदी कमी वयात साहित्याची आवड जोपासली, त्यांच्या प्रत्येक कवितेमधून समाज जागृती होते, ते सध्या बुद्धतत्वाच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांना अनेक अनेक शुभेच्छा असेही अनिल मोरे म्हणाले.
यावेळी विचारपीठावर सुप्रसिद्ध मराठी हास्य कलाकार श्री. गजानन गिरी, लक्ष्यवेध फाउंडेशनचे सचिव साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे, ऍड. एन.एम. रानवळकर, प्रा. सदाशिव भुयारे, देवराव पांडागळे, दादासाहेब शेळके, सुखदेव चिखलीकर, संभाजी पा. शिंदे, बालाजी थोटवे, संगमेश्वर लांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या अभिष्टचिंतन सोहळ्यात पुष्पगुच्छ ऐवजी ग्रंथ स्वीकारण्यात आले हे विशेष. या ग्रंथदान सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी सोनू दरेगावकर मित्रपरिवारांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बालाजी गवाले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सत्कारमूर्ती युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी मांडले. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील असंख्य मान्यवर, मित्रमंडळी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रंथभेट आलेले ग्रंथयात्रा काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.