कंधार तालुक्यात ३२० अंगणवाड्यांपैकी केवळ ८ अंगणवाडीलाच केली गॅस जोडणी..

 

सर्वत्र मागणी असतानाही संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

अनेक दिवसांपासून अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयाकडे धूर मुक्त अंगणवाडी करण्यासाठी गॅस जोडणीची मागणी केली जात आहे. परंतु कंधार तालुक्यात असलेल्या ३२० अंगणवाडी केंद्रांपैकी केवळ ८ अंगणवाडी मध्येच गॅस जोडणी केली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

० ते ६ वयोगटातील बालकांचे आरोग्य अबाधित ठेवून त्यांना सुदृढ बनवत कुपोषण मुक्त करण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून पूरक पोषण आहार शिजवून खाऊ घातला जातो. हा आहार शिजविण्यासाठी मुख्यतः इंधन म्हणून लाकडांचा वापर केला जातो. त्यामुळे धुराचा परिणाम होऊन बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धुरमुक्त अंगणवाडी होणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

अंगणवाडी धूर मुक्त व्हावी यासाठी तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत ग्रामपंचायत कार्यालयाकडे गॅस जोडणी करून देणे संदर्भात लेखी पत्राद्वारे अनेक वेळा मागणी केली आहे. परंतु अद्यापही या महत्त्वाच्या मागणीकडे अनेक ग्रामपंचायत कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नको असलेल्या शैक्षणिक साहित्य व भौतिक साहित्य खरेदी करून देण्याचा कल वाढला आहे.

कंधार तालुक्यात एकूण ११६ ग्रामपंचायत असून मोठी अंगणवाडी संख्या २४० तर मिनी अंगणवाडी संख्या ८० असून एकूण अंगणवाडी संख्या ३२० एवढी आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला १४ वा वित्त आयोग व १५ वा वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला असून त्यात अंगणवाडीसाठी १० टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असतानाही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी व उपयोगाकरिता सदरचा निधी खर्च केला जात नसून नको त्या साहित्याची खरेदी करून अनाठायी खर्च करत ते साहित्य अंगणवाडी कडे सुपूर्द करण्याचे काम ग्रामपंचायत च्या वतीने केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

आवश्यक त्या बाबीवर सदर चा खर्च करून त्या त्या अंगणवाडी च्या गरजेनुसार तेथील अंगणवाडी सेविके च्या मागणीनुसार त्यांना साहित्य खरेदी करून दिले तर नक्कीच त्याचा लाभ होईल आणि शासनाचा निधी उपयोगी लागेल जसे की आजघडीला गॅस कनेक्शन जोडणी अतिमहत्त्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *