नांदेड – मानवाच्या दैनंदिन जीवनात योग अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण असे असून आजच्या धावपळीच्या आणि धक्काधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीनेही योगाचे महत्त्व वाढलेले आहे. शालेय जीवनापासूनच याची सुरुवात करतांना सर्व शाळांनी परिपाठात योगासनांचा अंतर्भाव करावा असे आवाहन जवळा देशमुख येथील जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शाळेत राबविल्या जाणार्या शालेय तथा सहशालेय उपक्रमांबरोबरच दररोज एक योगासन हा पाच मिनिटांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम आदी प्राणायामाबरोबरच सोमवार-ताडासन, मंगळवार- वृक्षासन, बुधवार- पादहस्तासन, गुरुवार- भद्रासन, शुक्रवार- भुजंगासन, शनिवार- पवनमुक्तासन असे आठवड्याचे वेळापत्रक शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या मूल्य संस्कारांची आज आवश्यकता भासत आहे त्यात शालेय अभ्यासक्रमात योग-विज्ञान हा शास्त्रीय महत्त्व जपणारा पाठ्यक्रम समाविष्ट केला पाहिजे. यासाठी योग शिक्षक म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जागतिक योग दिनानिमित्त विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर आणि सहशिक्षक एस.एम. घटकार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने संतोष अंबुलगेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरील उपक्रमात गावकर्यांचेही सहकार्य लाभत असून सरपंच कमलताई शिखरे, साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, उपाध्यक्ष चांदू झिंझाडे, बाबुमियाँ शेख, आनंद गोडबोले, माधव टिमके, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनीषा गच्चे, आरोग्य सखी सुमेधा शिखरे आदी सहभाग नोंदवित आहेत.