पड र पाण्या पड र पाण्या कर पाणी पाणी , शेत माझं लई तान्हल चातका वाणी …. मृगाने मारले आता आर्द्रा तरी तारणारा का..? भेगाळलेल्या जमिनीला पावसाची आस अन बळीराजाला लागलाय पेरणीचा ध्यास..

 

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

मृग नक्षत्र संपले तरीही पेरणी योग्य पाऊस आणखी झालाच नसल्यामुळे सध्यातरी फुलवळ सह परिसरात उन्हाळा सदृश्य परिस्थितीच आहे , गेली अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त कडाक्याच्या उन्हाळा पडल्याची प्रचिती आपण घेतलेलीच असून गेली कांही वर्षा पासून मुबलक पाऊस झाला नसल्याने जमिनीची तहान कांहींकेल्या भागायला तयार नाही . त्यामुळे पाणी टंचाई चे चटकेही आपण सोसलेच आहेत . हवामान खात्याने वर्तविल्याप्रमाणे म्हणावातसा पेरणी योग्य पाऊस कांहींकेल्या होत नाही आणि जमिनीला पडलेल्या भळी तरी कश्याने बुजणार ? मृग नक्षत्र यंदा कोरडेच गेले , आर्द्रा नक्षत्र आले तरी म्हणावातसा पाऊस कांही पडेना . तेंव्हा अशीच कांहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे की , भेगाळलेल्या जमिनीला पावसाची आस अन बळीराजाला लागलाय पेरणीचा ध्यास म्हणनुच म्हणावे लागतेय मृगाने मारले आता आर्द्रा तरी तारणारा का..?

ता. ८ जून रोजी मृग नक्षत्र सुरुवात झाले तेंव्हापासून अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नसून ता.२२ जून रोजी आर्द्रा नक्षत्र उजाडले तेंव्हा पेरणीपूर्व मशागती पूर्ण करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला आता जसजसा पेरणीचा पल्ला पुढे जातोय तसतशी चिंता वाढत असून उशीरा होणाऱ्या पेरणीमुळे नक्कीच खरिपाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार याची भीती मनात घर करून आहे . गेले वर्षी ८ जून पासून कापूस लागवडीला सुरुवात झाली होती आणि आज तारखेपर्यंत जवळपास बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या होत्या . परंतु यावर्षी आणखी खरिपाच्या पेरणीला सुरुवातच झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढच होत असून गाराडून आलेल्या आभाळाकडे मान वर करून पाहण्याशिवाय हातात दुसरे कांहीच नाही.

सध्या शेतीची उरलीसुरलेली कामे करण्यासाठी बळीराजा शेतात गेला असता जमिनीला पडलेल्या भळी पाहून हैराण होत असून , एकीकडे मृगाचे किडे मात्र सर्वत्र भटकंती करत फिरत असलेले मात्र मन मोहून घेत आहेत , तर दुसरीकडे आताच काळ्या जमिनीवर गोगलगायीनी घातलेले थैमान पाहून पेरणी होताच उगवलेल्या पिकांच्या लहान लहान मोडक्यांना हे गोगलगायी वेळीच कातरून टाकत अतोनात नुकसान करणार याची आजपासूनच चिंता बळीराजा ला सतावत आहे.

 

पेरणीचे दिवस वरचेवर लांबत असल्यामुळे पाऊस आज होईल , उद्या होईल या आशेने बाजारातून महागामोलाचे बी- बियाणे , खत घरात आणून ठेवून पड र पाण्या पड र पाण्या कर पाणी पाणी , शेत माझं लई तान्हल चातका वाणी असे म्हणत शेतकरीराजा हवालदिल होऊन गेला आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *