कंधार : प्रतिनिधी
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून चिंचोली येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दि.२१ रोजी बुधवारी रात्री ९ वा. च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कंधार तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी त्र्यंबक शंकरराव कौंसल्ये (४५) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र ग्रामीण शाखा बारुळ बॅंकेकडून घेतलेल्या १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज होते त्यात शेतीतून उत्पादनच निघत नसल्याने बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? त्यात बँकेकडून येत असलेल्या नोटिसामुळं विवंचनेत ते नेहमी असायचे. दरम्यान, २१ जून रोजी रात्री घरी कोणी नसल्याने या संधीचा फायदा घेत स्वतःच्या घराशेजारील लिंबाच्या झाडास दोरी बांधून गळफास घेतला असता रात्री ९ वा. च्या सुमारास त्याच्या पत्नीने पाहून आरडा ओरड केल्याने शेजारील लोक धावले आणि त्यास झाडावरून उतरून तातडीने कंधार ग्रामीण रुग्णालय गाठले तेथील डॉक्टरांनी तपासून रात्री १०.१५ वाजता मरण पावल्याचे सांगितले .यानंतर मयताचे मोठे भाऊ भास्कर शंकर कौसल्ये वय ५५ वर्ष यांनी तातडीने घटनेची माहिती कंधार पोलीस ठाण्यास दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक आर.एस पडवळ करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.