मनवण्यातील सुख

…………… मनवण्यातील सुख..
मनवणारा असेल
तरच रुसण्याला अर्थ आहे
नाहीतर सगळेच व्यर्थ आहे..
मला जर कोणी विचारलं, तुझ्या आयुष्यात कशाची कमतरता आहे ?? त्याचं उत्तर असेल मनवणाऱ्याची .. सचिन आणि मी भांडत नाही , मी कधी हट्ट करत नाही आणि मला माहीत आहे , मनवण्याचं स्कील त्याच्याकडे नाही त्यामुळे रुसुन फायदा नाही.. पण आयुष्यात एकदा मी रुसावं आणि कोणीतरी मनवावं हे स्वप्न नक्कीच आहे.. रुसणं जर रोजचं झालं तर तोही कंटाळणार त्यावेळी तोच योग्य असेल कारण रोज मरे त्याला कोण रडे ..बरोबर ना ??
पण एकदा असं व्हावं हे अनेकींची इच्छा असेल..आपण सिनेमात पहातो , तेव्हा एकदा मी सचिन ला म्हटलं ,बघ तो कसा तिला मनवतो त्यावर सचिनने उत्तर दिलं , त्यांना पैसे मिळतात आणि बायकोला थोडीच मनवतात ते.. त्याचं बरोबर आहे पण त्यातील भावना महत्वाच्या आणि त्याच बऱ्याच पुरुषांना कळत नाहीत.. मुळातच रसिकता पुरुषांमधे नैसर्गिकरित्या कमीच असते..खुप कमी प्रमाणात पुरूष असतील जे स्त्रीच्या सगळ्या अंगांचा विचार करत असतील..
निसर्गता किवा स्वभाव असला तरीही पुरुषाने आपल्या माणसासाठी थोडं बदलायला हरकत नाही… स्वभावाला औषध असते त्याचा नक्की उपयोग करावा म्हणजे माझ्यासारख्या अनेक जणींची मनवण्याची इच्छा पूर्ण होइल..
रागवण्यापेक्षा रुसावं
चिडण्यापेक्षा हसावं
कोणी मनवणार नाही
माहीत असताना फक्त लिहीत रहावं
फक्त लीहीत रहावं..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *