नांदेडसह हिंगोलीची जागा खेचून आणू माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला कार्यकर्त्यांना विश्‍वास

हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदार संघ हा कांही अपवाद वगळता नेहमीच काँग्रेस सोबत राहिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुक रिंगणात उतरणार असून कार्यकर्त्यांची उपस्थिती व जोश पाहता, या ठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार असावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह दिसतो. त्यामुळे नांदेड सारखीच मेहनत घेवून हिंगोलची लोकसभेची जागा निवडूण आणू असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे दिला.

 

येथील शिवलिला हॉटेल प्रांगणात झालेल्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. प्रज्ञा सातव, माजी आ. भाऊराव पाटील-गोरेगावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, डॉ. अंकुश देवसकर, सचिन नाईक, जिल्हा उपाध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, सरचिटणीस हाफीजभाई आदींची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, येथील गर्दी पाहून हिंगोली लोकसभा लढण्याचा आपला निर्धार पक्का दिसत आहे. देशात भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून वज्रमूठ आवळली आहे. विभाजनामुळे कुणाचा फायदा होतो, हे मतदारांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. हिंगोली लोकसभा, विधानसभेतील जुन्या आकडेवारीचा दाखला देत ते म्हणाले की, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये वंचितमुळेच काँग्रेसचे नुकसान झाले आहे.

 

आता बीआरएसच्या माध्यमातून पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.
चव्हाण यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. मराठवाड्याची तर पार वासलात लावली. केंद्र सरकार तर शेतकरी विरोधी आहे. त्यांनी काढलेल्या तीन कायद्यांना पाच राज्यातील शेतकऱ्यांनी थेट दिल्लीत जाऊन विरोध केला. त्यामुळे ते मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधानांना करावी लागली.

म्हणून घडवताहेत दंगली
देशात हवा बदलत आहे. त्यामुळे भाजप हैराण आहे. याचा परिणाम म्हणून ही मंडळी दंगली घडवत आहे. कर्नाटकनंतर इतर राज्यांतही काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील सरकारही केवळ भूलभुलैय्या आहे. तिजोरी खाली आहे. नुसत्या घोषणा आहेत. केंद्र व राज्य सरकारचे इंजिन बंद पडल्याने यांना डबल इंजिन लागत असल्याची खिल्लीही चव्हाण यांनी उडविली.
अशोकरावांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे स्वप्न : सातव
आ. प्रज्ञा सातव म्हणाल्या, कर्नाटकच नव्हे, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात काँग्रेसची हवा पुन्हा वाहू लागली आहे. आपणही हे लक्षात घेतले पाहिजे. देशात राहुल गांधी यांना पंतप्रधान, तर राज्यात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून येण्याचे स्वप्न पाहात असल्याचे त्यांनी सांगितले, तर एकजुटीने लढल्यास काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळेल, असेही त्यांनी म्हटले.
यावेळी माजी आ.भाऊसाहेब गोरेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, डॉ.अंकुश देवसरकर, सचिन नाईक, हाफीजभाई यांची भाषणे झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *