नांदेड ; प्रतिनिधी
गेल्या २९ महिन्यापासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरु असलेला कायापालट हा जगवेगळा उपक्रम अमरनाथ यात्रेमुळे खंडित होऊ नये या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी जून महिन्यात दुसऱ्यांदा घेऊन ४० भ्रमिष्टांच्या कायापालट केल्यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२१ वी अमरनाथ यात्रा दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि.३० जुन रोजी नांदेड येथून रवाना होत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या सोमवारी अमरनाथ यात्रेत असल्यामुळे याच महिन्यात दुसऱ्यांदा कायापालट करण्याचा निर्णय दिलीप ठाकूर यांनी घेतला. त्यानुसार ३० व्या महिन्यात भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने ४० भ्रमिष्ठांचा कायापालट करण्यात आला.सकाळी ६ वाजल्यापासून शहरातील विविध भागातून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना सुरेश शर्मा, कामाजी सरोदे,महेश शिंदे, ॲड. चिरंजीलाल दागडिया, संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकीवर बसवून आणले.या वेळी भ्रमिष्टांची संख्या जास्त असल्यामुळे स्वयंसेवक बालाजी खोडके व ज्ञानेश्वर खोडके या दोघा पिता पुत्र असलेल्या स्वयंसेवकांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. बालाजी मंदिराचे महंत कैलासमहाराज वैष्णव यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या आभागी नागरिकांना साबण लावून स्वच्छ पाण्याने मनसोक्त स्नान घालण्यात आले. त्यानंतर सर्वांना अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले. ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावी म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःलाच नवल वाटत होते.हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली. आगामी ३१ वा कार्यक्रम सोमवार दि.७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती स्वयंसेवकांना द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
(छाया : संजयकुमार गायकवाड )