येत्या 29 तारखेला आषाढी एकादशी आहेत त्या निमित्ताने वारकरी संप्रदाय हा आषाढी एकादशी साजरी करण्या साठी सज्ज झालेला आहे. आळंदी व देहू येथून माऊली ज्ञानोबा- तुकोबाचा गजर करत दिंड्या पंढरपूर कडे वाटचाल करीत आहेत. दोन्हीही दिंड्याचे गोल रिंगण झाले आहेत .
आता वाखरी जवळ या दोन्ही दिंड्या एकत्रित येतील आणि वैष्णवांचा मेळा येथे भरेल *अवघे गरजे पंढरपुर।चालला नामाचा गजर*।। त्यामुळे पंढरीत स्वर्ग आवतारेल,आपल्या देवाला डोळे भरून पाहण्यासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी पंढरपुरात जमा होईल, घरदार
,मुलेबाळे ,संसार सर्व बाजूला सारून वारकरी अतिशय आनंदाने चालत, पाऊले,फुगड्या खेळत रथाच्या पुढे मागे जात मुखात विठ्ठल नामाचा जयघोष करीत, कपाळाला गोपीचंदन, गळ्यात तुळशीच्या माळा ,पांढरे शुभ्र कपडे घालून शुद्ध अंत:करणांने, हातात भगवा झेंडा घेऊन पंढरीची वारी करत आहेत,
*पंढरीची वारी आहे । माझ्या घरी* असे अभंग गात गात विठुरायाला साकडे घालत पुढे पुढे जात आहेत या वारीसाठी अनेक राज्यातून भाविक भक्त फार मोठ्या उत्साहाने, उल्हासाने आलेले आहेत. काय गोडवा असेल या पंढरीत ? भक्त पुंडलिकाने विटेवर या विठ्ठलाला उभे केले आणि आपल्या आई- वडिलांची सेवा केली असे संदर्भ आपण पाहतो. *युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा*।। अशी ही आरती पांडुरंगाची गावोगावी भजनी मंडळी मंदिरात देवळात म्हणत असतात. विठ्ठलाची काकड आरती भल्या पहाटे केली जाते आणि तोच विठ्ठल प्रत्यक्ष पंढरपुरात कटेवर हात ठेवून उभा आहे. त्यांना पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. सर्व दिशांनी जनसमुदाय पंढरपूरला येत आहे. कोणी बैलगाडीतून कोणी घोडा गाडीतून कोणी रेल्वेमधून ,बस मधून रिक्षा मधून हे सगळे भाविक येथे येतात,जास्तीत जास्त जण पायी दिंडीतून आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी येत आहेत या वारकऱ्यांच्या दिंड्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जात आहे हा नयनरम्य सोहळा फक्त पंढरपुरातच पाहायला भेटतो, येथे जात पात,पंथ, भाषा, लिंग, जन्मस्थान सर्व काही विसरून फक्त माऊलीचा जय घोष मुखाने करीत वारकरी पंढरपुरात दाखल होतात, चंद्रभागेला स्नान करून विठ्ठलाला पाहून वारकऱ्यांना आनंद झालेला असतो. एवढ्या मोठ्या वारीमध्ये अतिशय शिस्त असते, वारी मध्ये साधू -संत महंत, गरीब -श्रीमंत मालक -नोकर चाकर ,वारकरी , विद्वान, विणेकरी,मृदूगाचार्य महिला, लहान मुलं वेगवेगळे प्राणी या सर्वांचा समावेश आहे म्हणून विठ्ठल हा माझाच आहे तो माझाच राहणार आहे म्हणून प्रत्येकाला वाटते
*विठ्ठल माझा माझा।मी विठ्ठलाचा।।खरोखरच हा अभंग ऐकून कान तृप्त होतात. तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला किती तरी आनंदाने पायी वारी करून विठ्ठलाला डोळे भरून पाहतात, कारण विठ्ठलाने जनाबाईला जाते ओढू लागले, हृदयी बंदी खाना केला। आत विठ्ठल कोंडीला ।। असे खुद्द तिने म्हटले आहे, संत कान्होपात्रांनी विठ्ठलला सखा म्हटले आहे,संत चोखोबांचे गुरे सांभाळले, संत सावता माळ्यांच्या मळ्यात गेले,गोरोबा कुंभाराचे मूल जिवंत केले,*कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी* किती गोड वर्णन करता येते. म्हणूनच विठ्ठल ह्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे
.युगानुयुगे तो विटेवर उभा आहे , *पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला। उभा कसा राहिला विटेवरी।।पंढरपूरला प्रत्येक एकादशीला जाणारे वारकरी सुद्धा या महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्र ही खरोखरच संतांची भूमी आहे *या रे या रे लहान थोर* असे म्हणून सगळेजण एकत्रित येतात. आणि हा सोहळा येथे साजरा करतात.
*विष्णू मय जग! वैष्णवाचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ* आपल्याला माहीतच आहे की ही दिंडी सर्वधर्मसमभावाची आहे. सर्व जाती धर्माची आहे, एकात्मतेचे प्रतीक मानून ही दिंडी चालते. मुस्लिम बांधव अनेक ठिकाणी वारक-यांना फराळ व भोजन देतात,कित्येक ठिकाणी मुस्लिम बांधव ईद यावर्षी साधेपणाने साजरी करणार आहेत, कारण आषाढी एकादशी व ईद एकाच दिवशी येत आहेत,येथील वारकरी साधा भोळा आहे. त्यामुळे हा आनंद पंढरीची वारी केल्याशिवाय मिळत नाही, म्हणून एकदा तरी पंढरीला जावे असे मला वाटते. चल ग सखे चल ग सखे पंढरीला म्हणत पती आपल्या पत्नीला सोबत घेऊन जातो,पंढरपूर हे माझे माहेर आहे असे अनेक जणांनी म्हटले आहे. खरोखरच त्याची प्रचिती या वारीमधून येते.
आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करण्यासाठी येतात आणि या वारकऱ्यांच्या वतीने ” हे पांडुरंगा पाऊस पडू दे. धन्य धान्य पिकू दे” असे सर्वांच्या वतीने साकडं घालतात ,पड रं पाण्या पड रं पाण्या,कर पाणी पाणी, शेत माझं लई तहानेलं चातकावाणी आणि खरोखरच ही हाक भाविकांची पांडुरंगा पर्यंत पोहोचते आणि पांडुरंग हा पाऊस पाडतो अशी आपल्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. अशाप्रकारे युगानुयुगे विठ्ठल विटेवर उभा राहिला आहे,त्यामुळे त्याचे हात कटेवर व्यस्त आहेत, तो सर्वत्रच पाहात आहे, सदैव रंजल्या गांजलेल्या ,भोळ्या -भक्तांच्या कल्याणासाठी उभा आहे, म्हणून सर्वांनीच त्यांना पाहण्यासाठी एकदा तरी पंढरीची वारी करावी, *माझ्या जीवीची आवडी!पंढरपूरा नेईन गुढी* म्हणून या जीवनाचे सार्थक करून घ्यावे, जय जय राम कृष्ण हारी
*शब्दांकन*
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष:विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड