वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले – आमदार बाबासाहेब पाटील.

अहमदपूर ; ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कृषी कोहिनूर, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले. असे गौरवद्गार अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी टेंभुर्णी रोडवरील वसंतराव नाईक चौकाचे अनावरण प्रसंगी काढले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचा एक जुलै हा जन्मदिवस ,महाराष्ट्र शासन कृषी दिन म्हणून साजरा करते आणि या शुभमुहूर्तावर अहमदपूरच्या टेंभुर्णी रोडवरील चौकाला वसंतराव नाईक चौक असे नामकरण माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते त्यांनी पुढे असेही सांगितले की वसंतराव नाईक यांचे फार मोठे उपकार महाराष्ट्रावर आहेत. त्यांनी ०९ मे १९६२ रोजी पंचायत राज् ची स्थापना करून महाराष्ट्राला पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायती बहाल केल्या .एक मे १९६२ ला औद्योगिक महामंडळाची स्थापना करून उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचे काम केले . १२ ऑक्टोबर १९६४ रोजी ज्वारी संशोधन केंद्राची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या धान्य उत्पादनाला योग्य भाव दिला. महाराष्ट्राला ६०० आश्रम शाळा देऊन वाडी तांड्याच्या मुलांना शिक्षणाची गंगा घरापर्यंत नेली . १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये महाराष्ट्राला भारताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे केले. १९६६ च्या कोयना भूकंपामध्ये भूकंपग्रस्तांना दहा हजार घरे बांधून दिली. एक मे १९६६ ला मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळवून दिला . २६ जानेवारी १९६९ पासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना चालू करून इथल्या गोरगरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हाताला काम दिले . १९७० मध्ये कुळ कायद्यापासून पाच लाख ३७ हजार ६५५ एकर जमीन भूमी हिनाना वाटप केली आणि १९७१ ला कापूस एकाधिकार योजना महाराष्ट्राला दिली. १९७२ ला नवीन मुंबईची स्थापना करण्यात आली. १९७२ ला नवीन औरंगाबाद वसविले. १९७५ पर्यंत १४ लाख खेड्यांना वीज जोडणी दिली व तीन लाख शेतकऱ्यांना विद्युत पंप दिले. २८ मे १९७६ ला राज्य बियाणे महामंडळाची स्थापना करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नवीन नवीन बियाणे देण्याचं काम केलं. उजनी, जायकवाडी, अरुणावती, अप्पर पेनगंगा ,येलदरी ईसापुर धरण राजाला बहाल केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा तर वसंतराव नाईक साहेबा सारखाच असावं . वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला वर्षा बंगला ही देणगी दिली .आज पर्यंत सगळेच्या सगळे मुख्यमंत्री त्या वर्षा बंगल्यामध्ये राहतात. राहुरी ,परभणी, अकोला आणि दापोली ही चार कृषी विद्यापीठे वसंतराव नाईक यांनी स्थापन केली आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नवीन नवीन बियाण आणून दिली .
दररोज दहा लाख मजुरांना काम देणारा महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक होते ,असे ठामपणे सांगावे लागेल .चंद्रपूर, परळी, पारस व कोराडी ही औष्णिक विद्युत केंद्र वसंतराव नाईक यांनी उभी केली आणि आज जो महाराष्ट्र विद्युत च्या बाबतीत परिपूर्ण आहे ती वसंतराव नाईकांचीच देणगी आहे. म्हणून वसंतराव नाईकला महाराष्ट्राचे हिरवे सपान असे म्हणतात आणि शेतकऱ्यांच्या गळ्यातलं ताईत म्हणतात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दुरडीत कष्टकऱ्यांच्या दुरडीत भाकर देण्याचं काम हे वसंतराव नाईक यांनी केलं म्हणून वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.
या वसंतराव नाईक चौक अनावरण आणि सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान सिंह राजपूत हे होते. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्री धर्मपाल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हिंगणे तात्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख , बोधिसत्व फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे, वरवंटीचे सरपंच श्री चंद्रकांत राठोड, गोर सेनेचे अध्यक्ष श्री संतोष राठोड, युवक नेते श्री विकास राठोड प्रसिद्ध कवी श्री गणेश चव्हाण, प्रा भगवान अमलापुरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
प्रमुख पाहुण्यांनी वसंतरावजी नाईक यांच्या कार्यावर उजाळा टाकला.
पायलट किराणा सेंटरचे श्री अक्षय पाटील आणि चंद्रकांत मिरजगावे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
चौक अनावरण आणि जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार एन डी राठोड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *