नांदेड – वाढती महागाई ,बेरोजगारी,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष वैचारिक भूमिकेची प्रतारणा याला जनता कंटाळली असून काँग्रेसची क्रेडिबिलिटी आणखी वाढली असल्याने सत्ता परिवर्तन निश्चित आहे या महाराष्ट्र राज्याच्या सत्ता परिवर्तनासाठीचे नेतृत्व नांदेडने करावे असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साद घातली आहे.
येथील कुसुम सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती आणि दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कै. सौ. कुसुमताई चव्हाण पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, पुरस्कारप्राप्त मान्यवर प्रा. सुषमा अंधारे, अभय देशपांडे, डॉ. विठ्ठल लहाने, पंजाबराव डख तसेच दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे,संचालक बालाजी जाधव ,संदीप पाटील ,सल्लागार मनोहर आयलाने यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील आजच्या आयाराम-गयाराम राजकारणावर मात करुन महाविकास आघाडी आणखी मजबुत करायची आहे. काँग्रेसची आज राज्यात आणि देशात विश्वासहार्यता वाढली आहे. याचा लाभ महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत नक्कीच होईल. त्यासाठी आपल्याला आता अधिक सक्रिय होऊन लोकांमध्ये जावे लागेल. आपली भूमिका त्यांना सांगावी लागेल. महाविकास आघाडीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासारखे नेते असल्याने हे काही फार अवघड नसल्याचे त्यांनी सांगितले
गडचिरोली, चंद्रपूरसारख्या अविकसित भागात चळवळीचे काम करताना आपण राजकीय क्षेत्रात आलो. गडचिरोलीसारख्या नक्षलवादग्रस्त भागात त्याकाळी वर्तमानपत्र सुद्धा तीन-तीन दिवसांनी येत असत. त्यामुळे सरकारच्या विविध योजना, सरकारी नोकऱ्यांची माहिती या भागातील तरुणांना मिळत नसे. आपण स्वतः स्कूटरवर जाऊन या भागात वर्तमानपत्रातील नोकऱ्यंची माहिती फळ्यावर चिटकवून तरुणांना सरकारी नोकरीविषयी जागरूक करण्याचे काम केले. चळवळीत काम केल्यामुळे सामान्य माणसाशी आपली नाळ जोडली गेली. ती आजही कायम आहे. या काळात प्रसिद्धी माध्यमांचे विशेषतः वर्तमानपत्रांचे महत्व किती आहे हे लक्षात आले. आजही बातम्या देणारे भरमसाठ चॅनेल वाढले असले तरी, सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असला तरी वर्तमानपत्रांचे महत्व जरासुद्धा कमी झालेले नाही. वाचकांचा आजही मुद्रीत माध्यमावरच विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक सत्यप्रभा करत असलेले काम अतिशय महत्वाचे आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर थाप मारणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे या पुरस्कारप्राप्त मान्यवरांना प्रेरणा, ऊर्जा मिळते शिवाय त्यांच्या हातून आणखी जनसेवेची कामे होतील. ईश्वर हा जनसेवेतच आहे हेही या पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कामाकडे पाहिले की लक्षात येते. डॉ. विठ्ठल लहाने यांच्यासारखे शल्यचिकित्सक म्हणजे सामान्या माणसासाठी देवदूत असतात. डॉ. लहाने यांनी केलेले काम केवळ कौतुकास्पदच नाही तर महाराष्ट्र भूषणपेक्षाही मोठे आहे, असे गौरवोदगारही विजय वडेट्टीवार यांनी काढले. आजच्या राजकारणाचा स्तर घसरल्याची चिंता व्यक्त करुन माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले, की चांगल्या माणसांनी राजकारणात यावे की नाही असा प्रश्न आज पडत आहे. मात्र, चांगली माणसे राजकारणात आली तरच राजकारणातील व्यक्तिगत चिखलफेक थांबेल. यासाठी प्रयत्न करावे लागतील. आजच्या राजकारणाकडे पाहिले म्हणजे डॉ. शंकरराव चव्हाण यांची आठवण येते. त्यांच्यासारख्या विकासाची जाण असलेले, दूरदृष्टी असलेले नेतृत्व महाराष्ट्र आणि देशाला लाभले हे आपले भाग्यच आहे. कडक शिस्तीचे मुख्यमंत्री, केंद्रीय गहमत्री म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले.
विरोधकांच्या सोयीच्या राजकारणात
विश्वासार्हतेत काँग्रेस च अव्वल-माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
विचार-भूमिकेच्या बळावर निवडणूकीत विजय मिळवायचा नंतर आपल्या सोयी नुसार भूमिका घ्यायची यातून राजकीय पक्षाची क्रेडिबिलिटी संपण्याच्या मार्गावर असतांना जनतेमधील विश्वासार्हतेत काँग्रेस च अव्वल असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की ,अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही राजकारणाचा स्तर घसरत आहे.यापूर्वी आपली वैचारिक भूमिका मांडून सत्तेवर येवो की विरोधी पक्षात विचाराशी प्रतारणा होत नव्हती. सत्तेत आलेला पक्ष आपल्या विचारांच्या माध्यमांतून राज्याच्या प्रगतीसाठी काम करत आता. राजकारणाचा स्तरच बदलला असल्याचे दिसून येते. विकास कामास निधी देतांना हात आखडता ,पक्षपात असा ज्या पक्ष व राजकीय नेत्यावर आरोप करून दुसऱ्या पक्षा सोबत युती करून सत्तेत जाता तो राजकीय पक्षाचा नेता आपल्या समर्थकांसहा तुमच्या युतीत येतो आणि पुन्हा वित्त मंत्री होतो आता विरोध नाही हे मतदार पाहत आहेत यातून राजकारण्यांपेक्षा नोटा ला अधिक मत्ते पडतात की काय अशी स्थिती निर्माण होत आहे.
यावेळीही दै.सत्यप्रभाच्या निवड समितीने हवामानाचा अचूक अंदाज ,पत्रकारिता ,वैद्यकीय सेवा ,उपेक्षितांसाठीचे काम आदी क्षेत्रांतील उत्कृष्ट काम करत राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या मान्यवरांची केलेली निवड योग्य झाली असल्याचे सांगत सुषमाताई अंधारे, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आणि हवामानतज्ज्ञ पंजबराव डख यांचे कार्य आगामी काळात आणखी उल्लेखनीय असेल असा विश्वासही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
दुश्मनी म कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों
राजकारणात वैचारिक मतभेद असावेत प्रत्येक पक्षाने आपली भूमिका जोरकस मांडावी मात्र यातून टोकाची कटुता ,शत्रुत्वाची भावना याला थारा असता कामा नये असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों या शाहिरीतून राजकीय पक्षांची वाटचाल कशी असावी हे स्पष्ट केले आहे.