नांदेड, दि. १७ जुलै २०२३:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुमारे दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण यांनी आज दुपारी हडसणीकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही लावून धरणारच आहोत. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडावे, अशी विनंतीही त्यांनी केली. दरम्यान, हडसणीकर यांची प्रकृती खालावत असल्याने राज्य सरकारने तातडीने त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. आंदोलनकर्ते हडसणीकर विष्णुपुरी, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल आहेत.