नांदेड – कोणत्याही धर्मातील साधुसंत स्वतःसाठी नाही तर समाजाच्या भल्यासाठी ईश्वराकडे प्रयत्न करीत असतात. त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक भक्ताला ते यशस्वी भव असा आशिर्वाद देतात. परंतु त्यांनी दिलेला आशिर्वाद प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ती व्यक्ती सदाचारी असली पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले.
येथील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयात वीरशैव लिंगायत शिवाचार्यांच्यावतीने राष्ट्रसंत सद्गुरु 108 ष.ब्र.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेल्या अधिक श्रावणमास शिवनाम सप्ताहच्या तिसऱ्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बिचकुंदेकर महाराज, मुखेडकर महाराज, बेटमोगरेकर महाराज, वसमतकर महाराज, वाईकर महाराज यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणातील अनेक शिवाचार्य व स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, प्रत्येक माणसाने जीवनात धार्मिक असले पाहिजे. धर्माच्या आचरणामुळे व्यक्ती सुसंस्कारीत होतो. कुठलाही समाज किंवा धर्म असो त्यांचे धर्मगुरु आलेल्या प्रत्येक व्यक्तिला आशिर्वाद देतात. परंतु हा आशिर्वाद त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्या व्यक्तीचे आचरण चांगले असले पाहिजे. असे म्हणत त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनातील कांही उदाहरणे यावेळी दिली.
यावेळी किशोर स्वामी व संतोष पांडागळे यांची समयोचित भाषणे झाली. प्रारंभी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, किशोर स्वामी, संतोष पांडागळे यांचा गुरुवर्यांनी सत्कार करून त्यांना आशिर्वाद दिला. यावेळी गोविंद गोदरे व हिरेमठ यांची उपस्थिती होती. अधिक मासातील या शिवनाम सप्ताहास मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे.