साहित्यिक देविदास फुलारी यांच्या ” बाबा बर्फानी ” हे गित अमरनाथ यात्री संघांची अधिकृत प्रार्थना ;७५ यात्रेकरूंचे सोमवारी नांदेड येथे होणार आगमण

 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांना अमरनाथच्या गुहेत असतांना सुचलेले ” बाबा बर्फानी ” या गीताला अमरनाथ यात्री संघांची अधिकृत प्रार्थना म्हणून मान्यता देण्यात आली असून आगामी प्रत्येक अमरनाथ यात्रेत जेवण्याच्या आधी ही प्रार्थना म्हटली जाणार असल्याची घोषणा अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप ठाकूर यांनी केली आहे.

 

२२ व्या अमरनाथ यात्रेतील सर्व ७५ यात्रेकरूंचे वैष्णोदेवीचे दर्शन सुखरूप झाले असून सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता हमसफर एक्सप्रेस ने नांदेडला आगमन होणार आहे.

गेल्या २२ वर्षात अमरनाथ यात्री संघातर्फे शेकडो भाविकांनी दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप यात्रा पूर्ण केलेली आहे .या वर्षी यात्रेमध्ये प्रख्यात मराठी कवी देविदास फुलारी हे सपत्नीक सामील झाले होते. नांदेड मध्ये पूर्वतयारी केली असल्यामुळे अवघड असलेली अमरनाथ यात्रा सर्वांची यशस्वी झाली.

 

अमरनाथच्या गुहेत बर्फा पासून बनलेले शिवलिंगाचे दर्शन झाल्यानंतर ध्यानमग्न असताना देविदास फुलारी यांना ” बाबा बर्फानी ” गीत सुचले.

बाबा बर्फानी, बर्फानी बाबा
तुझ्या दर्शने उगवे आभा ||ध्रु ||

हिमालयाचा अंश शंभो तू
अमरपणाचा मंत्र दिला तू
गुहेत भक्ती संचित गाभा
तुझ्या दर्शने उगवे आभा…|| १ ||

हिरण्यधवल ही माय शिवानी
हिमगौरी ही माय हिमानी
गिरीशिखरावर तुझाच ताबा
तुझ्या दर्शने उगवे आभा || २ ||

तांडव आता शांत करावे
शांती वैभव सकळा द्यावे
अमरनाथ हो प्रसन्न थांबा
तुझ्या दर्शने उगवे आभा || ३ ||

बाबा बर्फानी बर्फानी बाबा
तुझ्या दर्शने उगवे आभा….

संध्याकाळी बालटाल बेस कॅम्प ला आल्यानंतर त्यांनी हे गीत सर्वांसमोर गाऊन दाखविले. गीताची प्रेरणादायी शब्द रचना आणि सुंदर चाल पाहून दिलीप ठाकूर यांनी यापुढे ही प्रार्थना प्रत्येक अमरनाथ यात्रेत जेवणाआधी म्हटली जाणार असल्याची घोषणा केली. त्याला सर्व यात्रेकरूंनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.अमरनाथ, वैष्णोदेवी, श्रीनगर,गुलमर्ग या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन जम्मू तावी येथून हमसफर एक्सप्रेस ने सर्वांची परतीच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे.सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता नांदेडला आगमन होणार असल्यामुळे स्वागतासाठी अमरनाथ यात्री संघाच्या सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *