कंधार येथील रस्त्यामधील खड्डात बसुन माजी सैनिकांनी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीचा केला निषेध.

 

२८ जुलै पर्यंत काम चालू करा अन्यथा , रास्ता रोको आंदोलन करणार.बालाजी चुक्कलवाड
____________________________________________
कंधार प्रतिनिधी

कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते छ.शिवाजी चौक हा मुख्य रस्ता राजकीय द्वेषामुळे गेल्या दहा वर्षांपासून होत नाही.दोन वेळेस या रस्त्यासाठी आलेला निधी परत गेला आहे.सध्या या कामासाठी दहा कोटी रुपये निधी येवुन पडला असताना देखील चार महिन्यांपासून काम चालू होत नसल्याने कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांनी रस्त्यावरच्या खड्यात बसुन आमदार, खासदार,नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. दिनांक २८ जुलै पर्यंत काम चालू नाही केल्यास माजी सैनिक संघटना रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिला आहे.

कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक हा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून होणार असल्याच्या नुसत्या पोकळ चर्चाच ऐकायला मिळत आहेत.या रस्त्यासाठी पाच वर्षांत अनेकदा निधी आला परंतु राजकीय नेत्यांच्या श्रेयवादामुळे व टक्के वारीच्या हट्टापायी निधी परत गेला आहे. कंधार शहराच्या विकासासाठी राजकीय नेत्यांनी खोडा घातला असल्याने या लबाड पुढाऱ्यांवरचा जनतेचा विश्वासच उडुन गेला आहे.मुख्य रस्ताची दैनिय अवस्था झाली असल्याने नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.या कामासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला असुन त्याचे वर्कआर्डर झाली असे असतानाही गेल्या चार पाच महिन्यांपासून काम मात्र चालु होतं नाही.
कंधार शहर हे बसस्थानक ते गांधी चौक हे एकाच मुख्य रस्ताने जोडले गेले असुन याच रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे.सन 2009 पासुन या रस्त्याच्या नावाने राजकीय नेते पोळी भाजून घेत असल्याचे दिसून येते. 13 वर्षाखाली हायवे रस्त्याच्या नावाखाली बाजारपेठ उध्दवस्त करण्यात आली.मुळात हा रस्ता हायवे नव्हताच केवळ राजकीय नेत्यांच्या अहंकारामुळे रुंदीकरणाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती उध्दवस्त करण्यात आल्या. 13 वर्षात रस्ता झाला नाही याचे मोठे दुःख कंधारकरांना आहे.ज्या हायवे रस्त्याच्या नावाखाली बाजारपेठ पाडली ते रस्तेच शहराच्या बाहेरून गेल्याने शहराचे वैभवच गेले.येथिल राजकीय नेत्यांनी थोडे प्रयत्न केले असते तर हे रस्ते कदाचित शहरातुन गेले असते व शहराच्या विकासात भर पडली असती.येथील राजकीय पुढारी हे खेकडा प्रवृत्तीचे असल्याने विकास कमी परंतु एकमेकांवर खालच्या पातळीवर टिका करुन आपणच खरे विकासपुरुष असल्याचा गाजावाजा करणे हाच उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहे .
महाराणा प्रताप चौक ते स्वप्नभुमी या रस्त्याची दैनिक अवस्था झाली असुन खड्डेमय रस्ता झाला आहे.नगर पालीकेच्या वतिने वारंवार खड्डे बुजवून मलमपट्टी करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात आहे. रस्त्याच्या खड्डयात मुरूम टाकला असल्याने सर्वत्र धुळ पसरली असुन या धुळीमुळे नाकाचे व फोफसाचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दोन्हीही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने शंभर फुटाचा रस्ता केवळ 20फुटच शिल्लक राहिला आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजुर झाला असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाले आहेत. गुत्तेदारांनी अद्यापही कामात सुरुवात केली नाही.
तत्कालीन आमदार प्रताप पा.चिखलीकर यांच्या काळात हा रस्ता मंजुर झाला होता ,त्या कामाचे नारळ ही फोडण्यात आले होते परंतु काम झाले नाही.आठ महिन्यापुर्वी विद्यमान आमदार यांनी पाच कोटी मंजूर केले परंतु नळगे आणि त्यांच्यात दिलजमाई झाली नसल्याचे आमदार महोदयांनी पाच कोटीचा निधी वापस घेतला.महाराणा प्रताप चौक ते छ.शिवाजी चौक हा रस्ता चार पदरी होणार असून यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या मोठमोठ्या बातम्या छापून आल्या परंतु अद्यापही रस्त्याचे काम चालु झाले नाही.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने संपूर्ण रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचले आहे व रस्ता चिखलमय झाला आहे या रस्त्यावरून रोज अनेक अपघात होत आहेत. चार दिवसा खाली ठाकूर नावाचा व्यक्ती रस्त्यात पडल्याने त्याच्या हाताचा झाला आहे त्यामुळे या व्यक्तीने भर रस्त्यातच आंदोलनही केले होते. असे रोज अपघात होत असतानाही सार्वजनिक विभाग, नगरपरिषद, आमदार व खासदारांना जाग येताना मात्र दिसत नाही. आज कारगिल विजय दिन असल्याने माजी सैनिक संघटनेच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात बसून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

चौकट
गेल्या चार-पाच महिन्यापासून रस्त्याच्या कामाच्या संदर्भात फक्त तारीख पे तारीख देणे चालू आहे प्रत्यक्षात मात्र काम होत नसल्याने कंधारकर संतप्त झाले आहेत. कारगिल विजय दिनाच्या दिवशी माजी सैनिकांना रस्त्यासाठी आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी प्रशासनासाठी बाब आहे. यापुढे तारीख पे तारीख चालणार नसून 28 जुलैपर्यंत रस्त्याचे काम त्वरित चालू करा अन्यथा माजी सैनिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड दिला आहे. या पद्धतीचे निवेदनही तहसीलदार यांना देण्यात आले त्यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन कांबळे तालुका सचिव पोचीराम वाघमारे मीडिया प्रमुख उमाजी पंधरवड बाहदरपुर सर्कल प्रमुख संभाजी कल्याणकर मुळा सर्कल प्रमुख मनोहर गोमारे जिल्हा मीडिया प्रमुख विजय चेमकुरे मधुकर देव कांबळे व माजी सैनिक वडजे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *