Post Views: 59
नांदेड – जिल्ह्यात बालविवाह विरोधी चळवळ जोर धरत आहे. विविध माध्यमांतून आणि स्तरांतून कोणत्याही परिस्थितीत बालविवाह रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले जात आहेत. जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी अनोखी शक्कल लढवित शाळेत शिकणाऱ्या मुलांमुलींकडून कोणत्याही परिस्थितीत भविष्यात बालविवाह न करण्याचे प्रतिज्ञापत्रच लिहून घेतले आहे! मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विशेषतः मुलींनी हे प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना पोस्ट कार्डावर लिहून पाठवले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व शाळांतील मुला मुलींनी कोणत्याही परिस्थितीत बालविवाह न करण्याचे पत्र गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे लिहून पाठवण्याचे आवाहन केले होते. लहान वयातच बालविवाहासंबंधी माहिती आणि चीड निर्माण व्हावी यासाठी सदरील उपक्रम राबविण्यात येत आहे. असे पत्र लोहा स्वतःचे नाव, पत्ता, शाळेचे नाव, इयत्ता या माहितीसह पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांना तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पाठवून अवगत केले आहे.
चौकट…
काय आहे प्रतिज्ञापत्रातील मजकूर?
‘मी माझे पदवीपर्यंतचे शिक्षण अखंडपणे पूर्ण करीन. मी कोणत्याही परिस्थितीत, कुणाच्याही दबावाला अथवा अमिषाला बळी पडून बालविवाह करणार नाही. मी माझ्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही. माझ्या गावात किंवा परिसरात बालविवाह होत असेल तर पोलीसांना कळवून तो रोखण्याचा प्रयत्न करु, अशी प्रतिज्ञा करते.’