शेकापचा ७६ वा वर्धापनदिन साजरा
कंधार/प्रतिनिधी
दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांची राजकीय कारकीर्द शेकापमधुन सुरु झाली. त्यांनी पक्षनिष्ठा आयुष्यभर जोपासली. पक्षाच्या माध्यमातून ३५ वर्षं विधीमंडळाचे कणखर नेतृत्व केले. मतदार संघातील सामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडले व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. एक पक्ष-एक तत्व आणि पक्षाशी असलेली बांधिलकी आयुष्यभर त्यांनी जोपासली, असे स्पष्ट प्रतिपादन श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले.
दि.३ ऑगस्ट रोजी क्रांतिभुवन बहाद्दरपूरा येथील मुक्ताईप्रभा निवास येथे शेकापचा ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त लालबावटा ध्वजाचे पुजन करुन वर्धापनदिन साजरा करण्यात आला. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ.भाई केशवरावांनी आयुष्यभर पक्षाशी एकरुप राहिले. गद्दारी केली नाही. एकनिष्ठ राहुन पक्षाची परंपरा जपली. मतदारसंघातील अठरापगड गोरगरीब जनतेला आयुष्यभर सोबत घेऊन सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्य केले. डॉ. भाईंच्या कार्याच्या आठवणीना उजाळा देताना प्रा.पुरुषोत्तम धोंडगे यांना अश्रू अनावर झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई पुंडा पाटील दुरपडे, पंडितराव पाटील पेठकर, परसराम धोंडगे, माधवराव पेठकर, मगदुम साहेब, बाबुराव कोटाळे, बाबुराव आईनवाड, ॲड. प्रकाश डोमप्ले, संभाजीराव उदगीरवाड, दत्तात्रय एमेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भाईंचे जुने सहकारीही ध्वज पूजनास उपस्थित होते. यावेळी डाॅ. भाई केशवराव धोंडगे यांच्या स्मारकाचे डिझाईन दाखवून चर्चा करण्यात आली.